अन् पालकांनी दिल्या मुलांच्या हाती चक्क सायकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 01:25 AM2019-09-06T01:25:30+5:302019-09-06T01:25:47+5:30

अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपये दंड असल्याने काही पालकांनी तर सायकली विकत घेऊन दिल्या आहेत. आजपर्यंत कुणाचेही न ऐकणारे विद्यार्थी निमुटपणे सायकलला पायडल मारत शाळा महाविद्यालयात आणि शिकवणीलाही जात आहेत.

And the parents bled in the hands of their children | अन् पालकांनी दिल्या मुलांच्या हाती चक्क सायकली

अन् पालकांनी दिल्या मुलांच्या हाती चक्क सायकली

Next
ठळक मुद्देनवीन वाहन कायद्याचा धसका : अल्पवयीन मुला-मुलींच्या वाहनांवर अप्रत्यक्ष बंदी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मोटर वाहन कायद्यातील नव्या नियमांचा आणि दहा पट दंडाचा पालकांनी चांगलाच धसका घेतला असून आपल्या अल्पवयीन मुलामुलींकडील दुचाकी वाहने काढून घेत त्यांच्या हाती चक्क सायकली दिल्या आहेत. भंडारा शहरातील शिकवणी वर्गासमोर दुचाकी घेऊन येणारे विद्यार्थी आता सायकलने येत असून वर्गासमोर सायकलच्या रांगा लागत आहेत. अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपये दंड असल्याने काही पालकांनी तर सायकली विकत घेऊन दिल्या आहेत. आजपर्यंत कुणाचेही न ऐकणारे विद्यार्थी निमुटपणे सायकलला पायडल मारत शाळा महाविद्यालयात आणि शिकवणीलाही जात आहेत.
मोटर वाहन कायद्यातील दुरुस्ती अद्याप राज्यात लागू झाली नाही. मात्र सोशल मिडीयावरून याबाबत ‘जनजागृती’ सुरु आहे. याचा चांगलाच धसका पालकांनी घेतल्याचे दिसत आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाच्या रकमेत तब्बल दहा पट वाढ होत आहे. त्यातही अल्पवयीन मुलामुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली. अनेक पालक आठव्या वर्गात मुलगा-मुलगी गेला की त्याला दुचाकी देतात. शाळा, महाविद्यालय आणि शिकवणी वर्गालाही ही अल्पवयीन मुले दुचाकीने भरधाव जातात. अनेकदा पोलिसांनी याविरुद्ध मोहीमही उघडली. अनेक पालकांना दंडही झाला, परंतु आतापर्यंत असलेला नाममात्र दंड म्हणून पालक मोकळे होत होते. कुणी मनावर घेत नव्हते. मुलांच्या हट्टापुढे पालकांचेही चालत नव्हते. त्यामुळे मुले घरून पालकांची दुचाकी घेऊन शिकवणी वर्गासह शहरातही भटकत होते. परंतु आता नवीन वाहन कायदा अस्तित्वात येत आहे. त्यात मोठ्या प्रमाणात दंड असल्याने पालकांनी मुलांकडील दुचाकीच्या चाव्या आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. मुलाने कितीही आग्रह केला तरी २५ हजार रुपये दंडाचा धसका घेत कोणताच पालक सध्या तरी दुचाकी देताना दिसत नाही. परिणामी शाळा महाविद्यालयात आणि शिकवणी वर्गासमोरही आता सायकलला पायडल मारत येणारे विद्यार्थी दिसत आहेत. स्टँडमधील दुचाकीची जागा सायकलनी घेतली आहे. अनेक पालकांनी नव्या कोऱ्या सायकली मुलांना विकत घेऊन दिल्या आहेत. जनजागृतीने जे इतके वर्षात झाले नाही ते केवळ दंड वाढताच शक्य झाले.

वाहतूक पोलिसांचे काम हलके
दुचाकी चालविणाºया अल्पवयीन मुलामुलींविरुद्ध वाहतूक शाखेने आतापर्यंत अनेकदा मोहीम उघडली. शाळा महाविद्यालयासमोर उभे राहून मुलांच्या हाती चलान दिले, परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नाही. मात्र दहा पट दंडाची तरतूद होताच पालकांनी स्वत:हूनच मुलांच्या दुचाकी काढून घेतल्या आणि पोलिसांचे काम हलके झाले.
शिकवणी वर्गासमोर सायकलची गर्दी
शहरातील विविध ठिकाणी शिकवणी वर्गांचे पेव फुटले आहे. पार्कींगची कोणतीही व्यवस्था नसतानाही शिकवणी वर्ग सुरु आहेत. या ठिकाणी अल्पवयीन मुले-मुली आपल्या दुचाकी भर रस्त्यावरच उभे करत होते. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता. शिकवणी वर्ग सुटण्याच्या वेळी मोठा गोंधळ उडत होता. आधीच वाहन चालविणे येत नाही आणि त्यात गर्दी. अशावेळी अपघाताची भीतीही कायम असायची. परंतु १ सप्टेंबर पासून शहरातील शिकवणी वर्गासमोरील दुचाकीची गर्दी ओसरली असून त्या ठिकाणी आता सायकली दिसू लागल्या आहेत.

Web Title: And the parents bled in the hands of their children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.