अन् कर्मचाऱ्यांनी केले विश्वास काटकर यांच्या प्रतिमेचे दहन, संप संस्थगीत पण निर्धार कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 06:05 PM2023-03-21T18:05:13+5:302023-03-21T18:05:23+5:30
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्रच्या भरोश्यावर जिल्हा पातळीवर संप पुकारण्यात आला होता.
इंद्रपाल कटकवार
भंडारा : सोमवारी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर राज्याचे कर्मचारी संघटनेचे राज्य समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली होती. या निर्णयाचा भंडारा जिल्ह्यात कर्मचारी संघटनेसह समन्वय समितीने तीव्र विरोध केला. परिणामी मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास संपकरी कर्मचाऱ्यांनी काटकर यांच्या प्रतिमेला जोडे मारुन दहन केले. तसेच घोषणाबाजी केली.
सोमवारी राज्य पातळीवर झालेल्या चर्चेनंतर राज्य समन्वय समितीचे निमंत्रक काटकर यांनी घेतलेल्या निर्णयाचा प्रचंड असंतोष भंडारा जिल्ह्यात दिसून आला. सोमवारी सायंकाळीच समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयाबाबत संभ्रमता व्यक्त केली होती. संपाच्या सातव्या दिवशी झालेली वाटाघाटी अशाप्रकारे संपुष्टात येईल याची पुसटशी कल्पनाही नव्हती, असे संपकरी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्रच्या भरोश्यावर जिल्हा पातळीवर संप पुकारण्यात आला होता. निमंत्रकांनी समन्वय समितीतील कुठल्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेतल्याचे जिल्हा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जुनी पेन्शनबाबत सविस्तर माहिती व निर्णय अजुन व्हायला आहे. शासनाने गठित केलेली समिती निर्णय घेणार असताना संप मागे घेण्याचा निर्णय स्वत:च कसा काय घेतला, असा प्रश्नही यानिमित्ताने शेकडो कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. संघटनांमध्ये फुट पाडून सरकार आपले आंदोलन फोडू तर पाहत नाही ना, अशी शंकाही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी काटकर यांच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरी त्रिमुर्ती चौकातील मंडपस्थळी काटकर यांच्या प्रतिमेला जोडे मारुन त्याचे दहन करण्यात आले. तसेच घोषणाबाजी करण्यात आली.
सात दिवसांपासून पुकारलेला संप आपण मागे घेतला नसून संस्थगित केला आहे. तीन महिन्यांपर्यंत शासनाने जुन्या पेन्शनबाबत योग्य निर्णय न घेतल्यास स्थगित केलेला बेमुदत संप करण्याचा निर्णय आपण राखून ठेवला आहे. आपण एक पाऊल मागे आलो असले तरी शासनाला जुनी पेन्शनवर निर्णय घ्यावाच लागेल. काही विघातक शक्ती आपली एकजुट फोडण्याची संधी शोधत आहे. त्याला कुणीही बळी पडू नये. आतापर्यंत अभद्य संघटनेला खिंड पडली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. जुनी पेन्शन मिळविण्यासाठी अशीच एकजुट कायम ठेवावी.
- रामभाऊ येवले, अध्यक्ष,
- दिलीप रोकडे, सरचिटणीस,
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जि. भंडारा.