...अन् 'तिथे' अश्रूही गोठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:26 AM2021-06-04T04:26:49+5:302021-06-04T04:26:49+5:30
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सेवकराम ठवकर यांना तीन मुली आणि एक मुलगा. तिन्ही मुलींचे लग्न झाले, त्या सासरी गेल्या. इकडे ...
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सेवकराम ठवकर यांना तीन मुली आणि एक मुलगा. तिन्ही मुलींचे लग्न झाले, त्या सासरी गेल्या. इकडे एक मुलगा, पत्नी आणि सून असे त्यांचे लहान कुटुंब. दहा वर्षांपूर्वी मुलगा मनोजची संसारवेल फुलली. घरी नातू जन्माला आला. सेवकराम यांच्यासह कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. मुलगा मनोज मृदुभाषी. आदराने बोलण्याचे त्याचे गुण. तो शेतीच करायचा. एकेदिवशी अचानक त्याची प्रकृती बिघडली. खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू झाले. तो आजारातून बरा व्हावा, यासाठीचा कुटुंबांचा आटापिटा सुरू झाला. परंतु, व्हेंटिलेटरवर गेलेल्या मनोजने २६ एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. ही वार्ता कानोकानी संपूर्ण तकीया वॉर्डात पोहोचली अन् वॉर्ड शोकसागरात बुडाला.
तरुण मुलगा गेल्याचे अतीव दुःख कुटुंबात असताना, मनोजची आई कोरोनाच्या आजारावर औषधोपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती झाली. पण उपचार सुरू असताना २७ एप्रिल रोजी त्यांनीही मृत्यूला कवटाळले. तत्पूर्वी मध्यंतरी सेवकराम ठवकर हे देखील कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती झाले. उपचाराला चांगला प्रतिसाद ते देत होते. बरेही झाले होते. दोन दिवसात रुग्णालयातून सुटी होईल, असे चित्र असताना, काळाला त्यांचेही जगणे मान्य नसावे. मुलगा मनोज, पत्नी सुशिला यांच्या निधनानंतर तेरा-चौदा दिवसांनी म्हणजे १० मे रोजी त्यांनीही जगाचा निरोप घेतला. घरसंसार उद्ध्वस्त झाला. सात-आठ वर्षांचा नातू हेरंभ पोरका झाला, तर सून प्रियंका एकाकी, निराधार पडली. हे संकट पचविताना तिचे अश्रूही गोठले आहेत.
बॉक्स
काळ धावून येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते : हिरामण बांते
सेवकराम ठवकर हे पोलीस गृहनिर्माण सोसायटीचा एक अंग असले तरी, ते एक खास मित्र होते. आम्ही दोघेही ३-४ महिन्यांच्या फरकाने सेवानिवृत्त झालो. भंडाऱ्यात एकाच कॉलनीत शेजारीच राहतो. धार्मिकतेची ओढ असल्याने आम्ही मंदिराशेजारी रोजच बसायचो... गप्पागोष्टी करायचो... असा आमचा नित्यक्रम होता. मात्र, काळ असा धावून येईल अन् मित्राचे सारे कुटुंबच असे उद्ध्वस्त करेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, असे सेवकराम ठवकर यांचे मित्र सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक हिरामण बांते यांनी सांगितले.