अन् रूपालीने पळवून लावला वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:03 AM2018-04-03T00:03:06+5:302018-04-03T00:03:06+5:30
मध्यरात्रीची वेळ. घराबाहेर बांधलेल्या शेळीने जोराचा हंबरडा फोडला. आवाज कशाचा आहे, नेमके काय झाले, हे बघण्यासाठी २१ वर्षीय तरूणीने दार उघडला. तिला कुठेही काहीच दिसले नाही. परंतु शेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तिला दिसली. त्यानंतर ती वळत असताना तिला कुणाची तरी सावली दिसली. त्या तरूणीने पुन्हा दाराकडे वळून बघितले असता समोर साक्षात जंगलाचा राजा ऐटीत उभा होता. क्षणाचाही विलंब न करता वाघाने तिच्यावर हल्ला चढविला. दोघांच्या झुंजीत शेवटी तिचा विजय झाला.
इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मध्यरात्रीची वेळ. घराबाहेर बांधलेल्या शेळीने जोराचा हंबरडा फोडला. आवाज कशाचा आहे, नेमके काय झाले, हे बघण्यासाठी २१ वर्षीय तरूणीने दार उघडला. तिला कुठेही काहीच दिसले नाही. परंतु शेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तिला दिसली. त्यानंतर ती वळत असताना तिला कुणाची तरी सावली दिसली. त्या तरूणीने पुन्हा दाराकडे वळून बघितले असता समोर साक्षात जंगलाचा राजा ऐटीत उभा होता. क्षणाचाही विलंब न करता वाघाने तिच्यावर हल्ला चढविला. दोघांच्या झुंजीत शेवटी तिचा विजय झाला.
ही कुण्या चित्रपटातील ‘कथा’ नव्हे तर एका तरूणीने हिंमतीच्या बळावर वाघाला पळवून लावल्याची सत्य घटना आहे. अंगावर थरकाप उडविणारी ही घटना साकोली तालुक्यातील ऊसगाव येथील असून रूपाली राजकुमार मेश्राम असे या जिगरबाज तरूणीचे नाव आहे.
या हल्ल्यात रूपाली व तिची आई जखमी झाली. जिजाबाई सुखरूप असून रूपालीवर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. २४ मार्चच्या मध्यरात्री हा घडलेला थरारक प्रकार रूपाली आजही निर्र्भयतेने सांगते. वाघाने हल्ला केल्याने रूपालीच्या डोक्याला, कमरेला व दोन्ही हातपायांना जबर दुखापत झाली आहे. रक्त वाहू लागल्यामुळे काय करावे, हे तिला सुचेना. परंतु लढण्याची हिंमत होती.
वाघ दिसताच भल्लाभल्याची दातखिळी बसते. परंतु रूपाली विचलीत झाली नाही. वाघाला प्रत्युत्तर देत असताना आई जिजाबाईनेही वाघावर काठीने प्रहार केला. यात वाघाने जिजाबाईवरही हल्ला केला. हिंंमतीच्या बळावर वाघाला पळवून लावायचचं, असा चंग बांधून रूपालीने वाघावर पुन्हा प्रहार केला. त्यानंतर वाघाने तिथून धूम ठोकली. घरे दूरवर असल्यामुळे आरडाओरड केल्याचा आवाजही शेजाऱ्यांना पोहोचला नाही. वाघाने पळ काढल्यानंतर दरवाजा बंद केला. रक्ताच्या थारोळ्यात असताना शेजाऱ्याला भ्रमणध्वनीवर याची माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्याची मदत मिळाली. दोघानांही साकोली उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. दोन दिवसांच्या उपचारानंतर भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात ‘रेफर’ करण्यात आले. रूपालीला गंभीर दुखापत असल्याने तिला नागपूर येथील मेडिकल कॉलेजला ‘रेफर’ करण्यात आले. या घटनेला आठ दिवसांचा कालावधी लोटला असला तरी वनविभागातर्फे या मायलेकींना कुठलिही आर्थिक मदत मिळालेली नाही. हातात जेवढी रक्कम होती तीही आता खर्च झाली आहे. औषधोपचाराला पैसा लागत नसला तरी अन्य खर्च पूर्ण करण्यासाठी सोने-चांदीचे दागिणेही त्यांनी विकले. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या रूपालीला या घटनेने लढण्याचे बळ मिळाले असले तरी आर्थिक मदतीपासून हे कुटुंब वंचित आहे.