अंधेर नगरी, चौपट राजा
By admin | Published: February 1, 2016 12:32 AM2016-02-01T00:32:38+5:302016-02-01T00:32:38+5:30
जिल्ह्यात अवैध दारू विक्री रोखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनासोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाचीही आहे.
४३ पैकी १५ पदे रिक्त : व्यथा राज्य उत्पादन शुल्क विभागाची
देवानंद नंदेश्वर भंडारा
जिल्ह्यात अवैध दारू विक्री रोखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनासोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाचीही आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भंडारा येथे कार्यालय असून या कार्यालयात प्रभारी अधिकारी असल्याने अवैध दारू विक्री रोखण्याच्या कारवाईची प्रक्रिया थंडावली आहे. त्यामुळे अंधेर नगरी चौपट राजा अशी स्थिती या विभागाची झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात दारूचा व्यवसाय व अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. जवळजवळ या अवैध व्यवसायात हजारांच्यावर अधिक पुरूष, महिला आदी गुंतलेले आहेत. अवैध दारूविक्रीविरोधात लगाम कसण्यासाठी जिल्हा पोलीसांची कारवाई नेहमी सुरू असते. मात्र दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी असलेली राज्य उत्पादन शुल्क विभागाची यंत्रणा सुस्तावलेली आहे.
भंडारा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात एकूण ४३ पदे मंजूर आहेत. यामध्ये अधीक्षक, निरिक्षक, दुय्यम निरिक्षक, सहायक दुय्यम निरिक्षक, जवान, वाहन चालक, लेखापाल, लघुटंकलेखक, वरिष्ठ लिपीक, लिपीक, चपराशी असा बराच मोठा फौजफाटा आहे. मात्र या कार्यालयात १ अधीक्षक, ३ निरीक्षक, ६ दुय्यम निरीक्षक, सहायक दुय्यम निरीक्षक,जवान, लिपिक यांची प्रत्येकी एक पद व वाहन चालक-नि- जवानची २ पदे, असे एकुण १५ पदे रिक्त आहे.
अवैध दारूविक्रीसंदर्भात धडक कारवाई करून गुन्हे नोंदविण्याची महत्त्वाची जबाबदारी अधीक्षक, निरीक्षक व दुय्यम निरीक्षक या तीन अधिकाऱ्यांवर आहे. मात्र अधीक्षक एन. के. धार्मिक प्रभारी आहेत. येथील कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर भंडारा येथील कार्यालय चालविले जात आहे. त्यामुळे अवैध दारूविक्रीबाबत ठोस कारवाई होताना दिसून येत नाही.
दारूविक्रेत्यांविरोधात कारवाया ठप्प झाल्या आहेत. शासनाची उत्पादन शुल्क विभागाची यंत्रणा रिक्त पदांमुळे पांगळी असल्याने अंमलबजावणी कोसो दूर राहिली आहे. पोलीस प्रशासनाचे विशेष पथक कारवाया करण्यात गुंतले आहे. अवैध दारू विक्रीचा व्यवसाय व मोहफुलाच्या दारू भट्ट्या जिल्ह्यातील बहुतांश गावागावात सुरू आहेत. अनेक पोलीस ठाण्यांचे हप्तेही दुपटीने वाढले असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
भंडारा जिल्ह्यात ३११ अनुज्ञप्ती
जिल्ह्यात एकुण ३११ अनुज्ञप्ती आहेत. यात ६९ देशी दारु, तीन देशी दारुचे ठोक विक्रेते, सात बार, सात वाईनशॉप, १४७ बिअरबार, २१ बिअरची दुकान, एक मद्यार्क निर्मिती कारखाना, दोन साखर कारखाना, एक लॅब तपासणी यंत्र, एक आॅडर्नन्स फॅक्टरी, एक स्पिरीटबॉटल निर्मिती कारखाना, चार स्पिरीट विक्रीची दुकान, २९ मोहफुल, १८ देशीमधून बिअरची विक्रीचा समावेश आहे.
जिल्ह्यात ३११ अनुज्ञप्ती असल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात असली तरी या व्यतिरिक्त अनेक अनुज्ञप्ती अवैधरीत्या सुरु आहेत. महामार्ग, राज्यमार्ग यासह इतर मार्गांवर बेभानपणे दारुची खुलेआम विक्री सुरु आहे. असे असतानाही कारवाई मात्र बोटांवर मोजण्याइतकीच केली जाते. याकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येते.