आंधळगाव जि.प. शाळेत आता कॉन्व्हेंटचे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2016 12:28 AM2016-07-07T00:28:19+5:302016-07-07T00:28:19+5:30
जिल्हा परिषद शाळांमधील विद्याथीर् संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. ग्रामीण भागातही इंग्रजी कॉन्व्हेंटचे शिक्षण मिळत नसल्याने पालकांचे मराठी जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष होत आहे.
लोकमत शुभवर्तमान : जिल्हा परिषद सदस्य राणी ढेंगे यांचा पुढाकार
संजय मते आंधळगाव
जिल्हा परिषद शाळांमधील विद्याथीर् संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. ग्रामीण भागातही इंग्रजी कॉन्व्हेंटचे शिक्षण मिळत नसल्याने पालकांचे मराठी जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा परिषद शाळांना गतवैभव परत मिळावे यासाठी आंधळगावच्या जिल्हा परिषद सदस्या राणी ढेंगे यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद शाळेत कॉन्व्हेंट सुरु करण्यात आली आहे. या कॉन्व्हेंटमध्ये केवळ १०० रूपयात के.जी. १ आणि के.जी.२ असे वर्ग तयार करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील गरीब पालक इंग्रजी शाळांचा भरमसाठ खर्च करण्यासाठी सक्षम नसतात. त्यामुळे इच्छा असूनही मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण देता येत नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांना मराठी माध्यमातून शिक्षण घ्यावे लागते. ग्रामीण भागातील पालक हा शेती व्यवसायावर निगडीत असल्याने व परिसरातील इंग्रजी माध्यमाचे फॅड वाढत असताना त्यालाही आपल्या पाल्याला इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये शिकावावे, अशी इच्छा असते. मात्र आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने तो पालक आपल्या मुलांचा शिक्षण मराठी माध्यमातून करतो. याच उदात्त हेतूतून आंधळगाव क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या राणी ढेंगे यांनी गरीब पाल्यांचा विचार करून आंधळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठी माध्यमांच्या शाळांमधील घटत्या पटसंख्येच्या परिणामावर तोडगा काढला. जिल्हा परिषद शाळेतच इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटला सुरूवात करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद शाळा समिती पदाधिकाऱ्या समक्ष मांडला.
पदाधिकाऱ्यांनी होकार दिला. प्रस्ताव पारित करून भंडारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला. आणि शिक्षण विभागाने या प्रस्तावाला तातडीने मंजुरीही दिली. या प्रस्तावासाठी लोकप्रतिनिधींनीही मोलाचे प्रयत्न केले. अन् राज्यातील या पहिल्या प्रयोगाला शिक्षण विभागाने मान्यता दिली. नुकताच ७० विद्यार्थ्यांना १०० रूपयात प्रवेश देण्यात आला आहे.
माझी सेवा ग्रामीण भागातील जनतेसाठी असल्यामुळे त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाकरिता मी कटीबद्ध आहे. मराठी शाळा ओस पडत आहेत. प्रत्येक गावात कॉन्व्हेंटचे फॅड सुरु आहे. इंग्रजी शाळा अतोनात शुल्क आकारत आहे. खासगी वाहनांमधून मुलांना डांबल्यासारखा प्रवास सुरू आहे. जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांविना राहत असल्याने हा इंग्रजी कॉन्व्हेंटचा प्रस्ताव मंजूर करून कमी पैशात शिक्षण देण्याचा प्रयत्न लोकसहभागातून सुरु केला आहे. यामुळे मराठी शाळांना चांगले दिवस येतील, असा विश्वास आहे.
- राणी ढेंगे, जिल्हा परिषद सदस्य आंधळगाव