अंगणवाडीतार्इंची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 09:30 PM2018-08-24T21:30:08+5:302018-08-24T21:31:19+5:30
शासनाने अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा घाट रचला असून याविरूद्ध आवाज उठविण्यासाठी जिल्हाभरातील अंगणवाडीताई शुक्रवारी आक्रोश मोर्चाने येथील जिल्हा परिषद कार्यालयावर धडकल्या. त्यांनी तब्बल दोन तास ठिय्या देऊन प्रशासनाला निवेदन सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाने अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा घाट रचला असून याविरूद्ध आवाज उठविण्यासाठी जिल्हाभरातील अंगणवाडीताई शुक्रवारी आक्रोश मोर्चाने येथील जिल्हा परिषद कार्यालयावर धडकल्या. त्यांनी तब्बल दोन तास ठिय्या देऊन प्रशासनाला निवेदन सादर केले.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी, युनियन (आयटक) व अंगणवाडी कर्मचारी सभा (एचएमएस) यांच्यावतीने भंडारा येथील शास्त्री चौकातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे राज्य निमंत्रक दिलीप उटाने, अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्ष सविता लुटे, अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हाध्यक्ष किसनाबाई भानारकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. इंदिरा गांधी चौक, पोष्ट आॅफिस चौक, बसस्थानक, त्रिमुर्ती चौक मार्गे जिल्हा कचेरीवर धडकला. यावेळी मोर्चेकरांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात २५ पेक्षा कमी मुले असेल तर ती अंगणवाडी बंद करून शेजारच्या अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा आदेश त्वरीत रद्द करावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दरवर्षी मानधन वाढविण्याच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार मानधन देण्यात यावे, लाईन डिस्टींगच्या कामाची सक्ती बंद करावी, प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वेतन देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्याचा दर्जा देवून वेतन व भत्ते लागू करावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरावी यासह २० मागण्यांचा समावेश आहे.
या मोर्चात सचिव अल्का बोरकर, उपाध्यक्ष मंगला गजभिये, रिता लोखंडे, मंगला रंगारी, गौतमी मंडपे, शमीम बानो, मंगला गभने, रेखा टेंभुर्णे, सुनंदा बडवाईक, छाया क्षीरसागर, सदानंद ईलमे, कुंदा भदाडे, लिलावती बडोले, अनिता घोडीचोरे, सुनंदा चौधरी, विजया काळे, वंदना पशिने यांच्यासह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या कार्याध्यक्ष पुष्पा हुमणे, कल्पना साठवणे, शोभा बोरकर, त्रिवेणी माकडे, विणा भोगे, विद्या वाघमारे यांच्यासह जिल्हाभरातील हजारो अंगणवाडीताई मोर्चात सहभागी झाल्या होत्या.शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा निघाला तेव्हा अंगणवाडी तार्इंनी दिलेल्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडीतार्इंची मोठी गर्दी झाली होती. मात्र हा मोर्चा शिस्तबद्ध काढण्यात आला.
एकूण लाभार्थी संख्या विचारात घ्या
अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. त्यातच पहिले पाऊल म्हणून कमी संख्या असलेल्या अंगणवाड्या नजीकच्या अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी केंद्राच्या लाभार्थ्यांची संख्या ठरविताना एकूण लाभार्थ्यांची संख्या विचारात घ्यावी, अशी मागणी मोर्चेकरांची आहे. अंगणवाडी केंद्रातून केवळ तीन ते सहा वर्षांच्या मुलांना सेवा दिली जात नाही तर शून्य ते सहा वर्षाआतील मुलांना सेवा दिली जाते. गरोदर माता, स्तनदामाता, किशोरी मुलींनाही सेवा दिली जाते. राज्यात आजही लोकसंख्येच्या आधारावर अंगणवाडी केंद्र उघडले नाही. मात्र अंगणवाडी केंद्रांचे समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शासनाच्या मुळ उद्देशाला तळा जाईल, असे मोर्चेकरांचे म्हणणे आहे.