अंगणवाडी इमारत जीर्णावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 10:14 PM2018-01-03T22:14:36+5:302018-01-03T22:15:06+5:30
गोंडीटोला येथील अंगणवाडी इमारत जीर्ण झाली आहे. इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. यामुळे बालकांचे जीव धोक्यात आले आहे.
आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : गोंडीटोला येथील अंगणवाडी इमारत जीर्ण झाली आहे. इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. यामुळे बालकांचे जीव धोक्यात आले आहे. भिंतीला भेगा पडल्या असून नवीन इमारत मंजुर करण्याची मागणी पालक व गावकऱ्यांनी केली आहे.
गोंडीटोला गावात जिल्हा परिषद शाळेच्या शेजारी अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले. ही इमारत जुनी असून भिंतीला भेगा पडल्या आहे. या अंगणवाडीत बालके भितीच्या वातावरणात विद्यार्जन करित आहेत. स्लॅब पावसाळ्यात गळत असतो. सतत पाऊस राहत असल्याने बालकांना अंगणवाडीत बसविणे जिकरीचे ठरत आहे. गावात दोन अंगणवाडी केंद्र आहेत. एका अंगणवाडीला स्वतंत्र इमारत नाही. एकमेव अंगणवाडीची जीर्ण इमारत आहे.
या इमारतीची सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला आहे. छताची दुरूस्ती करण्यात आली असली तरी निधी व्यर्थ खर्च करण्यात आला आहे. याशिवाय अंगणवाडीत बैठकीची सुसज्ज व्यवस्था नाही. यामुळे बालकाचे विद्यार्जन प्रभावित ठरत आहे. इमारतीच्या दुरवस्था संदर्भात बालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु प्रशासन ऐकायला तयार नाही. इमारतीची अवस्था कोंडवाडाप्रमाणे झाली आहे.
गावात नवीन अंगणवाडी इमारत मंजुर करण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव देण्यात आला आहे. परंतु या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. इमारतीची दुरावस्था असल्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसाची अध्यापनाची मानसिकता नाही.
या अंगणवाडीत ग्रामपंचायतचे मार्फत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी विजेवर सुरू होणारा ‘आरो’ देण्यात आला असला तरी या आरोचे एक ग्लास पाणी बालकांनी प्यायलेले नाही.
अंगणवाडीत विजेची सोय नसल्याने ‘आरो’ शोभेची वास्तु ठरली आहे. ‘आरो’ खरेदीत शासकीय निधीचा चुराडा करण्यात आला आहे. निम्याहून अधिक अंगणवाडीत विजेची सोय नाही. गावात अंगणवाडी इमारत मंजुर करण्याची मागणी आहे.
गोंडीटोला येथील अंगणवाडीची इमारत जीर्ण झाली असून बालकांना संभावित धोका असल्याची माहिती आहे. नवीन इमारत मंजुरी करिता प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
-प्रेरणा तुरकर,
जिल्हा परिषद सदस्य, बपेरा.