जिल्ह्यातील अंगणवाडी डिजिटल होणार काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 02:32 PM2024-05-13T14:32:43+5:302024-05-13T14:33:05+5:30
Bhandara : अनेक अंगणवाडीचे जागेअभावी व निधीअभावी इमारत बांधकाम झालेले नाहीत. अश्या परिस्थितीत जिल्ह्यातील अंगणवाडी डिजिटल होणार काय?
भंडारा : ग्रामीण भागांमध्ये अंगण परिसरात चालवली जाणारी माहिती केंद्र म्हणजे अंगणवाडी. या अंगणवाडीतून बालकांचे कुपोषण संपूर्णतः नष्ट करावे हेच मुख्य उद्दिष्ट; मात्र हे उद्दिष्ट ज्या अंगणवाडीमधून पूर्ण करायचे आहेत, त्याच अंगणवाडींची अवस्था बिकट आहेत. अनेक अंगणवाडीचे जागेअभावी व निधीअभावी इमारत बांधकाम झालेले नाहीत. अश्या परिस्थितीत जिल्ह्यातील अंगणवाडी डिजिटल होणार काय?
अंगणवाडीचा अर्थ काय?
अंगणवाडी शब्दाचा अर्थ 'अंगणामधील निवारा' असा आहे. अंगणवाड्या भारत सरकारने १९७५ साली एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत चालू केल्या. त्याचा उद्देश बालकांमधील कुपोषणाशी लढणे हा होता; मात्र सद्यस्थितीत या अंगणवाड्यांचा विकास बराच मागे पडला आहे.
१८७ इमारती निर्लेखनात ग्रामीण भागातील १८७ इमारती निर्लेखनात आहेत म्हणजेच नादुरुस्त आहेत. त्यापैकी ५० अंगणवाडी केंद्राला मंजुरी मिळाली आहे. मिनी अंगणवाडी केंद्र १०९ पैकी १०० अंगणवाडी केंद्र भाड्याचे आहेत. त्यांना स्वतःची इमारत नाही.
अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या सेविका व मदतनिसांच्या समस्या जशा कायम आहेत तशाच अंगणवाडींचीही समस्या सुटलेली नाहीत. परिणामी अंगणवाडीत शिकणारी बालके ही त्यांच्या हक्कापासून दुरावली जात आहेत. या अंगणवाडीमधून पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण व आरोग्य व आहार शिक्षण अशी कार्ये अंगणवाडी सेविका व मदतनिसांना करावी लागते. कारण स्थानिक अंगणवाडी ही आईसीडीएसचा आधारशिला आहे. खरं तर आईसीडीएस सेवा त्याच्या केंद्रांच्या विशाल नेटवर्कद्वारे पुरवल्या जातात. त्याला 'अंगणवाडी' म्हणतात. नावाप्रमाणेच अंगणवाडी हे एक केंद्र आहे. अंगणवाडी केंद्रसेविका चालवतात आणि मदतनीस त्यांना मदत करतात.
अंगणवाडी केंद्रे स्थापन करण्यासाठी सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे लोकसंख्येच्या निकषांवर आधारित आहेत. यात महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जातो. ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे आहे. तसेच माता-बालक यांच्या आरोग्य, आहार, कुपोषण या अन्य बाबींकडे लक्ष पुरवणे आदी कार्यांचा समावेश अंगणवाडी बालकांमध्ये होतो. याशिवाय पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागातील महिलांना आहार व आरोग्य याविषयी योग्य मार्गदर्शन करणे हे देखील अंगणवाडीचे मूलभूत कार्य आहे. एवढी कामे या अंगणवाडीतून होत असताना त्यांच्या आधुनिकीकरणाकडे म्हणजेच डिजिटायझेशनकडे वाटचाल होतांना दिसून येत आहे.
भंडारा जिल्ह्यात अंगणवाडींची संख्या १३०५ इतकी आहे. यात मिनी अंगणवाडी २०९ आहेत. मोठ्या अंगणवाडीमध्ये एक अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतीला एक मदतनीस असते तर मिनी अंगणवाडीमध्ये फक्त सेविका असतात. मानधन वाढीसह विविध न्याय मागण्यांकरिता राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आंदोलन केले होते. शासनाने त्यांना आश्वासनही दिले मात्र अंगणवाडींच्या अवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. ग्राउंड लेव्हलवर झुंजणाऱ्या या सेविका व मदतनीस जिथे काम करतात, तिथे सुविधांचा बोजवारा उडाला आहे, हीच खरी शोकांतिका आहे.
भंडारा जिल्ह्यात १३०५ मोठे अंगणवाडी केंद्र तर १०९ मिनी अंगणवाडी केंद्र आहेत. कार्यरत मदतनिसांची संख्या १०८५ आहेत. शहरी प्रकल्प १६५ अंगणवाडी केंद्र आहेत. यात अंगणवाडीच्या स्वतःच्या मालकीच्या इमारती ८१ असून ८४ अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत आहेत. जागेअभावी व निधीअभावी इमारत बांधकाम नाही.
- दिलीप उटाणे, कार्याध्यक्ष, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन कार्यक्रम म्हणूनही ओळखला जातो.