अंगणवाडी सेविकांनी मोबाईल केले जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:15 AM2021-09-02T05:15:39+5:302021-09-02T05:15:39+5:30
बोंडगावदेवी : अंगणवाडी कर्मचारी सभा संघटनेच्यावतीने विविध मागण्यांना घेऊन अर्जुनी-मोरगाव येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयावर तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस ...
बोंडगावदेवी : अंगणवाडी कर्मचारी सभा संघटनेच्यावतीने विविध मागण्यांना घेऊन अर्जुनी-मोरगाव येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयावर तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी धडक दिली. प्रकल्प अधिकाऱ्यांस मोबाईल परत देऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शासनाच्या विरोधात सेविका, मदतनीस यांनी निषेध व्यक्त करून तीव्र आक्रोश व्यक्त केला.
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सरिता मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील समस्त अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा आक्रोश मोर्चा दुर्गा चौकातून काढण्यात आला. त्यानंतर हा मोर्चा प्रकल्प कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका तसेच बालकांची योग्य माहिती वेळोवेळी संबंधितांना पुरविण्यासाठी सेविकांना मोबाईल देण्यात आले होते. मात्र, सॉफ्टवेअर इंग्रजी भाषेत असल्याने माहिती भरणे अवघड होत होते. मोबाईलची रॅम कमी असल्याने ते काम करीत नव्हते. मोबाईल नादुरुस्त असल्याने उत्तम प्रतीचा मोबाईल देण्यात यावा, अशी मागणी करून सर्व मोबाईल प्रकल्प कार्यालयात जमा करण्यात आले.
सन २०१४ पासून सेविका, मदतनीस सेवानिवृत्त झाल्या. त्यांची एकरकमी रक्कम अजूनही मिळाली नाही. त्यांची ऑफलाइन व ऑनलाइन माहिती द्यावी, अमृत आहाराचे पैसे सेविकांना देण्यात यावेत. आहार शिजविणाऱ्या सेविकांना ६५ पैशांप्रमाणे बिल काढून देण्यात यावे. २०१४ पासूनचे टीएबिल द्यावे, ओटी भरणे कार्यक्रमाचे पैसे देण्यात यावेत, सणांच्या सुट्यांची माहिती द्यावी, लाभार्थ्यांची ऑनलाइन यादी पर्यवेक्षकांनी करावी, सेविकांकडून पैसे घेऊन ऑनलाइन करू नये, आदी मागण्यांचे निवेदन प्रकल्प अधिकारी किरणापुरे यांना शिष्टमंडळासह देण्यात आले. मोर्चात तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या.