विस्थापितांसाठी लाखनीचे तहसीलदार ठरले देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:00 AM2020-04-02T05:00:00+5:302020-04-02T05:00:29+5:30
गडेगाव येथे गत काही दिवसांपासून जडीबुटीचा व्यवसाय करणारे कुटुंब तंबू ठोकून राहत आहेत. तर पिंपळगाव येथे गोपाळ समाजाची वस्ती आहे. लॉकडाऊनने रोजगार हरविल्याने त्यांना जगणे कठीण झाले होते. ही बाब तहसीलदार मल्लीक विराणी यांच्या लक्षात आली. त्यांनी शहरातील अधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांची बैठक घेतली. दानशूर व्यक्तींना आवाहन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन असल्याने हातावर आणून पानावर खाणाऱ्यांपुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत लाखनीचे तहसीलदार मल्लीक विराणी मदतीला धावून आले. गडेगाव येथील जडीबुटी विक्रेता आणि गोपाळ समाजासह मजुरांच्या भोजनाची व्यवस्था केली. लॉकडाऊनच्या काळात तहसीलदार विस्थापितांसाठी देवदूतच ठरले.
गडेगाव येथे गत काही दिवसांपासून जडीबुटीचा व्यवसाय करणारे कुटुंब तंबू ठोकून राहत आहेत. तर पिंपळगाव येथे गोपाळ समाजाची वस्ती आहे. लॉकडाऊनने रोजगार हरविल्याने त्यांना जगणे कठीण झाले होते. ही बाब तहसीलदार मल्लीक विराणी यांच्या लक्षात आली. त्यांनी शहरातील अधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांची बैठक घेतली. दानशूर व्यक्तींना आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत राईस मिल संघटनेतर्फे तांदूळ, सिंधी समाजातर्फे साखर, तेल, बिस्कीट, सृष्टी नेचर क्लबतर्फे कणीक आणि अधिकाऱ्यांतर्फे विविध जीवनोपयोगी वस्तू जमा झाल्या. या सर्व वस्तू दीडशे कुटुंबांना वितरीत करण्यात आल्या. तालुक्यात विविध ठिकाणी असलेल्या अशा विस्थापितांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत मदत पोहचविण्यात आली. तहसीलदार मल्लीक विराणी यांच्या या कार्याची प्रशंसा जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केली. जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी हा कित्ता गिरवावा असे आवाहन करण्यात आले. लाखनी तालुक्यातील एका अधिकाºयाने मनावर घेतल्यास सकारात्मक परिणाम होत असल्याचे यावरून दिसून आले.