पाेलीस ठाण्यात आमदारांनी वाहिली शिव्यांची लाखाेली, व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2022 12:44 PM2022-01-02T12:44:37+5:302022-01-02T13:00:24+5:30
व्यापाऱ्याचे पैसे पोलिसांनी लुटले असल्याचा आरोप तुमसर तालुक्यातील एका व्यापाऱ्याने केला होता, याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती. याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका आमदाराने पोलिसांचा चक्क अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
भंडारा : पोलिसांनी मारहाण करून कारमधील ५० लाख रुपये लुटल्याचा आरोप तुमसर तालुक्यातील व्यापाऱ्याने केला असून, तशी तक्रार मोहाडी ठाण्यात शुक्रवारी रात्रीच दिली. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या आमदार महाशयांनी चक्क पाेलिसांना अश्लील शिव्यांची लाखाेली वाहिली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आमदार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
राजू कारेमाेरे असे आमदारांचे नाव आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अविनाश वसंत पटले (रा. हसारा, ता. तुमसर) आणि त्यांचा मित्र यासिन छव्वारे हे दोघे ३१ डिसेंबरच्या रात्री १० वाजेच्या सुमारास नागपूरवरून भंडारा मार्गे तुमसरकडे जात होते. माेहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाजवळ कारसमोर एका पोलिसाने अचानक दुचाकी वळविली. पोलिसाला इंडिकेटर का दाखविले नाही, असे विचारणा केली असता पाेलिसानेच शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी तेथे उपस्थित इतर पोलिसांना बोलावून मारहाण केली. त्यानंतर कारमध्ये असलेले ५० लाख रुपयेही लुटले, अशी तक्रार मोहाडी ठाण्यात करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती होताच शुक्रवारी रात्रीच आमदार राजू कारेमोरे मोहाडी ठाण्यात पोहोचले. याठिकाणी त्यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. मात्र, कानउघाडणी करताना त्यांची जीभ घसरली. अतिशय खालच्या भाषेत अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे तेथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
पहाटे ४ वाजेपर्यंत तक्रार दाखल करण्याची कारवाई सुरू होती. एका पोलीस उपनिरीक्षकाच्या अटकेची मागणी यावेळी करण्यात आली. दुसरीकडे पाेलिसानेही शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार केली. सध्या प्रकरण चौकशीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आता प्रकरण कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन्ही बाजूने तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज बघून सत्य काय ते चौकशीत समोर येईल. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात येईल.
-राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक मोहाडी.