महामार्ग दुरुस्तीसाठी संतप्त खासदार उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 05:00 AM2021-10-04T05:00:00+5:302021-10-04T05:00:46+5:30
राज्यमार्ग असलेला भंडारा-तुमसर हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग परिवर्तित झाल्यानंतर या मार्गाचे रुंदीकरण आणि नव्याने बांधकाम केले जाणार आहे. मात्र सद्यस्थितीत या मार्गाची भंडारा शहरात झालेली अवस्था अत्यंत वाईट आहे. शास्त्री चौक ते टाकळीपर्यंत पायी चालणेही कठीण झाले असताना वाहन चालविणे जीवघेणे ठरत आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातून जाणाऱ्या व राष्ट्रीय महामार्ग परिवर्तित झालेल्या भंडारा-तुमसर मार्गाची शहरातून झालेली दुरवस्था पाहता त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात रविवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जीवघेणा ठरत असलेला रस्ता तात्काळ दुरुस्त केला जात नाही, तोपर्यंत माघार न घेण्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या खासदारांना सोमवारपासून काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सोमवारपासून काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही खासदार मेंढे यांनी दिला आहे.
राज्यमार्ग असलेला भंडारा-तुमसर हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग परिवर्तित झाल्यानंतर या मार्गाचे रुंदीकरण आणि नव्याने बांधकाम केले जाणार आहे. मात्र सद्यस्थितीत या मार्गाची भंडारा शहरात झालेली अवस्था अत्यंत वाईट आहे. शास्त्री चौक ते टाकळीपर्यंत पायी चालणेही कठीण झाले असताना वाहन चालविणे जीवघेणे ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग राज्य अधिनस्त सद्यस्थितीत असलेल्या या मार्गाची डागडुजी करण्यासंदर्भात अनेकदा मागणी केली गेली. प्रशासनाच्या वेळकाढूपणाला कंटाळून खासदार सुनील मेंढे यांनी पुढे येत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. आंदोलनाला आपला पाठिंबा आहे अशा शब्दात नाना पंचबुद्धे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी रुबी चद्दा, आशु गोंडाने, हेमंत महाकाळकर, कैलास तांडेकर, रजनीश मिश्रा, नगरसेविका चंद्रकला भोपे, साधना त्रिवेदी, शमीमा शेख, वनिता कुथे, गीता सिडाम, मधुरा मदनकर, भुमेश्वरी बोरकर, आशा उईके, संतोष त्रिवेदी, सूर्यकांत इलमे, मनोज बोरकर, रोशन काटेखाये, रोशनी पडोळे, माला बागमारे, पप्पू भोपे, अजीज शेख, यश ठाकरे, शैलेश मेश्राम, शिव आजबले, नागरिक उपस्थित होते.
विषय राजकारणापलीकडील
- रविवारी दुपारी खासदार मेंढे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व नागरिक शास्त्री चौक परिसरात रस्त्यावर उतरून वाहतूक अडवून धरली. यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, भाकपचे हिवराज उके हे सुध्दा सहभागी झाले होते. विषय लोकांच्या जीवाशी खेळणारा असल्याने राजकारणापलीकडे असल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत येथून न हलण्याची भूमिका सर्वांनी घेतली. अर्धा तास वाहतूक अडवून धरल्यानंतर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तेथे आले. चर्चेदरम्यान डागडुजीचे काम सुरू करण्याची मागणी खासदारांनी केली. यात होईल. सोमवारपासून काम सुरू करण्याचा शब्द कार्यकारी अभियंत्यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.