संतप्त नागरिकांनी केली कर बिलाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:29 AM2017-12-05T00:29:58+5:302017-12-05T00:30:18+5:30
वाढीव गृहकराच्या मुद्यावर भंडारा शहरातील नागरिक चांगलेच तापले आहेत. याचा भडका सोमवारी अखेर उडाला.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : वाढीव गृहकराच्या मुद्यावर भंडारा शहरातील नागरिक चांगलेच तापले आहेत. याचा भडका सोमवारी अखेर उडाला. संतप्त नागरिकांनी नगरपालिका कार्यालयावर हल्लाबोल करीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याधिकाºयांना वाढीव कराबाबत विचारणा करून पालिकेसमोर कर बिलाची होळी केली.
११ महिन्यांपुर्वी भाजपने नगर पालिकेत सत्ता काबीज केली. नवीन पदाधिकारी नागरिकांच्या समस्या सोडवतील, असे वाटत होते. मात्र गृहकराच्या सर्व्हेक्षणानंतर पाठविलेल्या कर बिलात भरमसाठ वाढ करण्यात आली. हा मुद्दा मागील आठवड्यात झालेल्या पालिकेच्या सभेत पदाधिकाºयांनी उपस्थित केला. यावर विशेष सभा बोलावून वाढीव कराबाबत तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र कुठलीही कारवाई झाली नाही.
सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास शुक्रवारी वॉर्ड परिसरासह अन्य वॉर्डातील नागरिकांनी पालिका कार्यालयावर हल्लाबोल केला. या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगरसेवक धनराज साठवणे, नगरसेवक सुनिल साखरकर यांनी केले. १२ वाजताच्या सुमारास मुख्याधिकारी अनिल अढागळे व उपाध्यक्ष रूबी चढ्ढा हे उपस्थित होते. मात्र चर्चा नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांच्याशी करायची आहे, अशी भूमिका नागरिकांनी घेतल्यावर नगराध्यक्ष पालिकेत पोहोचले. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्याधिकारी अढागळे यांनी वाढीव गृहकराच्या बाबतीत माहिती दिली. यात शहराचे पाच विभागात झोन म्हणून विभागणी करून सर्वेक्षण करण्यात आल्याचे सांगितले. नियमानुसारच प्रत्येक टप्प्यात काही पैशांची वाढ स्क्वेअर फूट प्रमाणे करण्यात आल्याचे सांगितले. ३०० रूपयांचे टॅक्स तीन हजार रूपये कसे झाले याचे उत्तर देता आले नाही. नगराध्यक्ष मेंढे यांनी चर्चेअंती वाढीव गृहकराबाबत पुन्हा फेरनिर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. कर कोणत्या पद्धतीने लावले व ते एवढ्यापटीने कसे काय वाढले याचे समाधानकारक उत्तर अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याधिकाºयांना देता आले नाही. संतप्त नागरिकांनी पालिकेच्या बाहेर येऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर कर बिलाची होळी केली. तसेच अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देवून गृहकर पुर्ववत करण्यात यावेत, अन्यथा पालिका विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला.
यावेळी धनराज साठवणे, सुनिल साखरकर, वासुदेव भुरे, संदीप केसलकर, मनिष डोरले, बबलु साकोरे, दिलीप पडोळे, नरेंद्र साखरकर, मंन्साराम बालपांडे, योगेश साखरकर, विजय बावनकुळे, हरीभाऊ भोंगाडे, रघुनाथ साकोरे, चंद्रशेखर कुंभलकर, गजानन सेलोकर, आनंद बांगडकर, सुनिल धुर्वे, शकुंतला बांगडकर, कुंडलीक पडोळे, सुधा साखरवाडे, संतोष भोंगाडे, राजु कांबळे, कनैय्या जांगळे, राजहंस बावनकुळे, नरेश देशमुख, दिपक भोंगाडे, नरेंद्र गौरी, संजय कारेमोरे, महादेव भोंगाडे, संजय साकोरे, मंदा साकोरे, शंकर साकोरे उपस्थित होते.