संतप्त ग्रामस्थांनी बंद पाडले नदीपात्रातील विहिरीचे बांधकाम; जलजीवन मिशन योजनेला खिंडार

By युवराज गोमास | Published: March 13, 2023 03:28 PM2023-03-13T15:28:47+5:302023-03-13T15:29:19+5:30

करडी येथील पाच कोटींची योजना प्रभावित

Angry villagers block construction of well in riverbed; breaks to Jal Jeevan Mission Yojana | संतप्त ग्रामस्थांनी बंद पाडले नदीपात्रातील विहिरीचे बांधकाम; जलजीवन मिशन योजनेला खिंडार

संतप्त ग्रामस्थांनी बंद पाडले नदीपात्रातील विहिरीचे बांधकाम; जलजीवन मिशन योजनेला खिंडार

googlenewsNext

भंडारा : मोहाडी तालुक्यातील मुंढरी बुज ग्रामवासीयांनी करडी येथील जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाच कोटींची योजनेच्या नदी काठावरील विहिरीचे काम पाडले बंद पाडले. १५ दिवसांपूर्वी झालेल्या या प्रकारामुळे करडी व मुंढरी गावात नव्या वादाला तोंड फुटले आहे. तालुका व जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रकरणी तोडगा काढावा, अशी अपेक्षा आहे.

अन्यथा योजना प्रभावित होऊन ग्रामवासी शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याचा धोका वाढला आहे. करडी येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाच कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. कंत्राटदार पोकलँड लावून विहीर खोदकामासाठी नदीकाठावर गेले असता मुंढरी बुज येथील काही नागरिकांनी खोदकाम बंद पाडले. कंत्राटदार व करडी येथील माजी सरपंच महेंद्र शेंडे यांनी विहीर खोदकाम करण्यासाठी २० बाय २० फुट जागा लागेल आणि १५ बाय १५ फुट जागा पंप हाऊससाठी लागेल, असे समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुणीही मानायला तयार नसल्याने अखेर वाद चिघळला आहे.

सात हजार लोकसंख्या असलेल्या करडीत नेहमीच पाणी टंचाई असते. गावात गोड पाण्याचे स्त्रोत नसल्याने १९८२ मध्ये तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य रामकृष्ण शेंडे यांनी मुंढरी बुज नदी घाटावर विहिरीचे खोदकाम करून पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र, गावाची लोकसंख्या व नळ कनेक्शन वाढल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून सध्या मुंढरी खुर्द येथील एक खासगी विहिरीवरून अपुरा पाणीपुरवठा सुरू आहे.

लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना साकडे

वादातीत जागा गट क्र २१ असून सरकारी आहे. इतर हक्कामध्ये गुरेढोरे चराईसाठी मुकरर आहे. तरी सुद्धा गावकऱ्यांनी काम बंद पाडल्याने माजी सरपंच महेंद्र शेंडे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, लोकप्रतिनधींना माहिती दिली आहे. तुमसर उपविभागीय अधिकाऱ्याने गावकऱ्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकरी ऐकायला तयार नसल्याने आता अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

करडी गावात खारट पाणी असून अस्तित्वात असलेली योजना गावाला पाणी पुरविण्यास असमर्थ आहे. त्यामुळे खासदारांच्या प्रयत्नातून गावासाठी योजना खेचून आणली. परंतु सरकारी जागा असतांना मुंढरी येथील काहींनी वाद घालून काम बंद पाडले. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याची अपेक्षा आहे.

- महेंद्र शेंडे, माजी सरपंच करडी.

Web Title: Angry villagers block construction of well in riverbed; breaks to Jal Jeevan Mission Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.