पशुपालन, दुग्ध व्यवसायातून समृद्ध बना
By admin | Published: February 13, 2017 12:21 AM2017-02-13T00:21:33+5:302017-02-13T00:21:33+5:30
निसर्गाच्या अवकृपेने मागील काही वर्षांपासून शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीव्यवसायासह पशुपालन व त्यातून दुग्ध व्यवसाय करावा.
भाग्यश्री गिलोरकर : पहेला येथे तालुकास्तरीय पशुप्रदर्शनी, पशुधनासह गोपालकांची उपस्थिती
भंडारा : निसर्गाच्या अवकृपेने मागील काही वर्षांपासून शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीव्यवसायासह पशुपालन व त्यातून दुग्ध व्यवसाय करावा. या जोडधंद्यातून शेतकऱ्यांनी समृद्ध बनावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी व्यक्त केले.
पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा तालुक्यातील पहेला येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी पार पडली. यावेळी त्या उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. पशुप्रदर्शनीला सरपंच सुनिल शेंडे, आमदार अॅड.रामचंद्र अवसरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, पंचायत समिती सदस्य परसराम देशमुख, प्रमिला लांजेवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.किशोर कुंभरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राजू शहारे, अॅड.मधुकांत बांडेबुचे, सत्कारमूर्ती दुधराम भुरले, प्राचार्य काटेखाये, यामिनी बांडेबुचे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी आमदार अॅड.अवसरे यांनी पशुपालन हा जोडधंदा न राहता प्राथमिक धंदा म्हणून करावे व यातून आर्थिक स्तर उंचवावा असे प्रतिपादन केले. डॉ.किशोर कुंभरे यांनी शासनाच्या विविध योजना व पशुपालनाविषयी माहिती देताना पशुपालकांनी पशुधनाकडे लक्ष देऊन स्वत:चा आर्थिक स्तर उंचावण्याचे प्रतिपादन केले. यावेळी मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. दरम्यान पशुप्रदर्शनीचे उद्घाटन सजविलेल्या गायीची पूजा करून करण्यात आले. या पशुप्रदर्शनी दरम्यान पशुसंवर्धन विभागाने रांगोळी व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प्रदर्शनीमध्ये नवजीवन मुकबधीर विद्यालय भंडारा येथील मतीमंद मुलामुलींनी नृत्य सादर करून सर्वांचे मने जिंकली. गांधी विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनीही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तर पुरुषोत्तम लिचडे यांनी शेतकऱ्यांवर लोकगीत सादर केले. प्रदर्शनीत शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी रांगोळी व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पशुविकास अधिकारी डॉ.गुणवंत भडके यांनी केले. तर आभार डॉ.प्रशांत वैद्य यांनी मानले. संचालन डॉ.प्रमोद सपाटे व डॉ.कोरडे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ.भडके, डॉ.वैद्य, प्रविण वैद्य, अजय चामलाटे, दुर्गे, प्रवीण टेंभुर्णे, विशाल खंगार, उत्तम पिकलमुंडे, किशोेर बोरकर यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
४०२ देशी विदेशी प्रजातींची पशुपक्षी प्रदर्शनी
या पशुप्रदर्शनीत ३९ संकरीत वासरे, २८ संकरीत कालवडी, ९२ संकरीत गायी, ५६ म्हशी, १०२ शेळ्या, २६ बैल, ५९ कोंबड्या असे पशुपक्षी व पशुधन पशुपालकांनी आणले होते. यासह शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. बचत गटाच्या माध्यमातून खाद्यपदार्थांची दुकाने लावण्यात आली होती. पशुसंवर्धनाशी संबंधित मुक्तसंचार पद्धतीचा गोठा, इको कुक्कुटपालन मॉडेल, सायलेज बॅग, अवझोला व हायड्राफोनीक्स पद्धतीने चारा उत्पादन प्रात्यक्षिक प्रकल्प ठेवण्यात आले होते.
देशी प्रजातीसह विदेशी प्रजातीही प्रदर्शनीत
या प्रदर्शनीत विविध जातीच्या गायी यात चिलार, गवळाऊ, गिर, सहिवाल या देशी प्रजातींसह जर्सी, होल्स्टन, फ्रिजीयन या विदेशी प्रजातींच्या गायी व वासरे पशूपालकांनी आणली होती. म्हशींमध्ये नागपुरी, सुरती, जाफराबादी व मुर्रा तर शेळ्यांमध्ये जमनापारी, उस्मानाबादी, सिरोही आदी जातींच्या शेळ्या आणण्यात आल्या होत्या. कोंबड्यांमध्ये कडकनाय, वनराज, गिरीराज, व्हाईटलेग हॉर्न, रोड आयलड, अॅसेल या प्रजातींचे कोंबड्या होत्या.
विजेते व उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना गौरविले
प्रदर्शनीत आणलेल्या पशुपक्षी व गोधनाला प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षिस देण्यात आले. गोपालकांना रोख रकमेसह गौरविण्यात आले. अमित चोपकर यांच्या जर्सी गायीला प्रथम क्रमांक तर संकरीत गटात यशवंत लकडे यांच्या खिल्लर गायीचा क्रमांक लागला. गावठी - देशी गटात दत्तू साहुली यांच्या म्हशीला हितेश बांडेबुचे यांच्या शेळीला तर विकास रंगारी यांच्या कोंबडीचा प्रथम क्रमांक आला.दुग्ध व्यवसायातून आर्थिक प्रगती साधणाऱ्या दुधराम भुरले यांचा सत्कार करण्यात आला.
गुराख्यांचा केला सहृदय सत्कार
गुराखी यांच्यावर नेहमी पशुधनाच्या चराईची जबाबदारी असते. ते समाजातील अन्य कार्यक्रमात दुर्लक्षित असतात. मात्र वेळप्रसंगी हिंस्त्र प्राण्यासोबत झुंज देऊन जनावरांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या गुराख्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते उपस्थित गुराख्यांना सहृदय गौरविले असा प्रसंग पहिल्यांदाच पशुप्रदर्शनीच्या रुपाने बघायला मिळाल्याने गुराख्यांच्या चेहऱ्यावरील समाधान दिसून येत होते.
२२ हजार लिटर दूध संकलन
पहेला येथील दुधराम भुरले यांच्याकडे सुरुवातीच्या काळात गोधन होते. कालांतराने त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरु केला. आता हा त्यांचा व्यवसाय यशोशिखरावर पोहचला आहे. व्यवसायामुळे गोधन सांभाळण्याकडे दुर्लक्ष होत असले तरी ते परिसरातील दुग्ध व्यवसायीकांकडून दूध संकलन करून विक्री करतात. एका दिवसाला २२ हजार लिटर दूध संकलन करतात. या बदल्यात ते शेतकऱ्यांना दुधाचा योग्य मोबदला देऊन आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करीत आहेत.