संचारबंदीच्या काळात जनावरांची तस्करी करणारे रॅकेट सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:34 AM2021-05-16T04:34:17+5:302021-05-16T04:34:17+5:30
तुमसर: गोहत्या बंदी कायद्याचे नियम कडक असून, जनावरांच्या वाहतुकीला परवानगी नाही. परंतु मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने तुमसर तालुक्यातील सीमावर्ती एका ...
तुमसर: गोहत्या बंदी कायद्याचे नियम कडक असून, जनावरांच्या वाहतुकीला परवानगी नाही. परंतु मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने तुमसर तालुक्यातील सीमावर्ती एका गावात गोधनाची तस्करी केली जात आहे. तेथून नागपूर व हैदराबाद येथे वाहनात डांबून जनावरांची वाहतूक सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. तस्करांचा दबदबा असल्याने त्यांच्यावर थातुरमातुर कारवाई होत असल्याने तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
कोरोना संक्रमण काळात महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. तर दुसरीकडे आंतरराज्यीय गोधन तस्कारीच्या वाहतुकीत वाढ झाली आहे. मध्यप्रदेशातून गोधनाची चोरट्या मार्गाने तुमसर तालुक्यात वाहतूक सुरू आहे. तालुक्यातील एका गावात तस्करीचा मोठा अड्डा झाला आहे.
मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातून बावनथडी नदी मार्गाने
गोधनाची वाहतूक तुमसर तालुक्यातील नदी काठावरील एका गावात करण्यात येते. तेथून ते गोधन नागपूर व हैदराबाद येथील कत्तलखान्यात जात आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राशिवाय जनावरांची वाहतूक सर्रास सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे.
यापूर्वी तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी व गोबरवाही येथील बजरंग दल कार्यकर्त्यांनी मध्यप्रदेशातून येणारी जनावरांची वाहने अडवली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. परंतु कारवाईनंतर जनावरांच्या वाहतुकीवर कोणताच परिणाम झालेला दिसत नाही.
तुमसर तालुक्यातील भूमिगत मॅग्ननीज खाण परिसरातील एका गावात मांसाची विक्री केली जात असल्याची माहिती आहे. तस्करांचा दबदबा मोठा असल्यामुळे यांच्याविरोधात स्थानिक नागरिक पुढे येत नाहीत. संचारबंदी काळात जनावरांच्या तस्करीत मोठी वाढ झाली तरी प्रशासन याबाबत अनभिज्ञ दिसत आहे.
जनावरांची आंतरराज्य वाहतूक व कत्तलखान्याकडे रवानगी याचे कडक नियम अस्तित्वात असल्यावरही सर्रास गोधनाची कत्तलखान्याकडे रवानगी होत आहे. नियम केवळ कागदोपत्री आहेत काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोधनाची वाहने अडविल्यानंतर त्या जनावरांची रवानगी जिल्ह्यातील गोपालन केंद्रावर करण्यात येते. त्यामुळे काही काळ तस्करीमध्ये खंड पडतो. पण त्यानंतर पुन्हा तस्करी सुरू होऊन त्या निष्पाप जनावरांची कत्तलखान्याकडे रवानगी करण्यात येते.