ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमाविरोधात अंनिसचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:35 AM2021-07-31T04:35:35+5:302021-07-31T04:35:35+5:30
मोहाडी : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा, मोहाडीतर्फे महाराष्ट्रात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाद्वारे ज्योतिषशास्त्र हा विषय सुरू ...
मोहाडी : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा, मोहाडीतर्फे महाराष्ट्रात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाद्वारे ज्योतिषशास्त्र हा विषय सुरू करू नये, या आशयाचे निवेदन तहसीलदार देविदास बोबुर्डे यांच्यामार्फत २९ जुलै २०२१ला मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आले.
निवेदनानुसार महाराष्ट्राला संतांची आणि महान सुधारकांची शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहे. या भूमीबाबत बुद्धांचा देश असा उल्लेख केला जातो. संत चक्रधर स्वामींपासून ते थेट संत गाडगे महाराजांपर्यंत वैज्ञानिक प्रबोधनाची परंपरा आहे, तर दुसर्या बाजुला महात्मा ज्योतिबा फुलेंपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते प्रबोधनकार ठाकरेपर्यंत समाजसुधारक होऊन गेले. त्यांची परंपरा चालू ठेवणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांचे कर्तव्य आहे. अशावेळी इग्नूतर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ज्योतिषशास्त्र या विषयात पदवी आणि पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. खगोलशास्त्र ज्योतिषशास्त्राला मान्यता देत नाही.
ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करणे म्हणजे लोकांना अंधश्रद्धेच्या दरीत लोटण्यासारखे आहे. स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्योतिषशास्त्राला कडाडून विरोध केला आहे. समाज विज्ञानाच्या दिशेने जाण्याऐवजी अज्ञानाच्या दिशेने ढकलला जाईल. हे थांबवण्यासाठी आपण ज्योतिषशास्त्र या अभ्यासक्रमांना मान्यता देऊ नये. प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा आपण पुढे चालू ठेवाल, याची खात्री आहे, अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष मदन बांडेबुचे, जिल्हा संघटक वसंत लाखे, डी. जी. रंगारी, रत्नाकर तिडके, मुलचंद कुकडे यांच्या मार्गदर्शनात अंनिस शाखा मोहाडीचे ग्यानचंद जांभूळकर, रामकृष्ण इटनकर, हितेश नथुराम गायधने, गिरीधर मोटघरे, सिराज शेख, अफरोज पठाण, आदर्श अशोक बडवाईक, अजय दयाराम कडव, प्रमोद सव्वालाखे, अजय धर्मदास चौरे, यशवंत थोटे यांच्या उपस्थितीत तहसीलदार बोबुर्डे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले.