ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमाविरोधात अंनिसचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:35 AM2021-07-31T04:35:50+5:302021-07-31T04:35:50+5:30
महाराष्ट्राला संतांची आणि महान सुधारकांची शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहे. आपल्या भूमीची ओळख ‘बुद्धांचा देश’ असा उल्लेख केला जातो. ...
महाराष्ट्राला संतांची आणि महान सुधारकांची शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहे. आपल्या भूमीची ओळख ‘बुद्धांचा देश’ असा उल्लेख केला जातो. संत चक्रधर स्वामींपासून ते थेट संत गाडगे महाराजांपर्यंत वैज्ञानिक प्रबोधनाची परंपरा आहे. दुसऱ्या बाजूला महात्मा जोतिबा फुलेंपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते प्रबोधनकार ठाकरेपर्यंत समाजसुधारक होऊन गेले. त्यांची परंपरा चालू ठेवणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अशावेळी इग्णूतर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ज्योतिष शास्त्र या विषयात पदवी आणि पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. खगोलशास्त्र ज्योतिष शास्त्राला मान्यता देत नाही. ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करणे म्हणजे लोकांना अंधश्रद्धेच्या दरीत लोटण्यासारखे आहे. स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्योतिषशास्त्राला कडाडून विरोध केला आहे. ज्योतिषशास्त्र हा अभ्यासक्रम शिकून महाराष्ट्रमध्ये कर्मकांड करणारे आणि आपला वेळ, पैसा आणि श्रम वाया घालवणारे युवक तयार होतील. समाज विज्ञानाच्या दिशेने जाण्याऐवजी अज्ञानाच्या दिशेने ढकलला जाईल. हे थांबवण्यासाठी आपण ज्योतिषशास्त्र या अभ्यासक्रमाला मान्यता देऊ नये, अशी मागणी आहे. शिष्टमंडळात ग्यानचंद जांभुळकर, रामकृष्ण ईटनकर, हितेश नथुराम गायधने, गिरीधर मोटघरे, सिराज शेख, अफरोज पठाण, आदर्श बडवाईक, अजय कडव, प्रमोद सव्वालाखे, अजय धर्मदास चौरे, यशवंत थोटे आदींचा समावेश होता.