पुण्यातील 'भिडेवाडा' राष्ट्रीय स्मारक घोषित करा
By admin | Published: January 5, 2016 12:39 AM2016-01-05T00:39:10+5:302016-01-05T00:39:10+5:30
१ जानेवारी १९४८ रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली.
माळी महासंघाची मागणी : सामाजिक न्यायमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भंडारा : १ जानेवारी १९४८ रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली. त्यामुळे या भिडेवाड्यास राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने करण्यात आली. याचे निवेदन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्यामार्फत निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली.
देशामध्ये अंधारात, काळोखात खितपत पडलेल्या महिला समाजाला शिक्षित करून, उठवून जागे करण्याचे काम फुले दाम्पत्याने केले. देशाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणात आहे व देशातील स्त्रीने शिक्षण घेतल्यास समाजाच्या विकासात तिचा मोठा हातभार लागेल अशी त्यांची भूमिका होती. स्त्री शिकली तर प्रत्येक माणूस घडेल, पयार्याने देश घडेल अशी महात्मा फुले यांची धारणा होती. ही धारणा कृतीत उतरविण्यासाठीच पुण्यातील भिडेवाड्यात पहिल्यांदा स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. त्यामुळे स्त्री शिक्षणाचा सूर्य उजाडला. असे असतानाही देशातील पहिली मुलींची शाळा असलेला भिडेवाडा अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. सांस्कृतिक राजधानी समजले जाणारे पुणे व त्यातील भिडेवाड्यातील शाळा शासनाच्या उदासीनतेचा बळी ठरत आहे. पारतंत्र्य काळात देशातील मुलींना शिक्षणाचा गंध नव्हता. अंधश्रद्धेपोटी, मुली शिकल्या तर जेवणाच्या ताटात अळ्या पडतील असाही समज होता. स्वत:च्या नवऱ्याच्या पंगतीत पत्नीला बसता न येणारा तो काळ होता. स्त्री शिकली तर स्वैराचार माजेल, स्त्री ने शिक्षण घेणे म्हणजे समाजाच्या नजरेने तो भ्रष्टाचार असा अपसमज जाणिकपूर्वक समाजात रूढ केला गेला. अशा काळात समाजाचा प्रखर रोष पत्करून महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचे कार्य भिडे वाड्यात सुरू केले.
या शाळेमुळे देशातील मुली आज उच्च शिक्षित होत आहेत. देशाचा विकासाच्या उंबरठ्यावर पोहचविण्यासाठी देशाच्या सर्वांगिण विकासाला ज्या शाळेतून सुरूवात झाली ती विकासाची जन्मदात्री इमारत म्हणजे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी अनेक वर्षांपासून लषा उभारला जात आहे. गतवर्षी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करू असे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप पावेतो हे पूर्ण केले नाही.
'भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक' बनवून देशातील नागरिकांना प्रेरणास्त्रोत म्हणून अर्पण करावे यासाठी सदर निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, प्रकाश अटाळकर, माधुरी देशकर, दिनेश देशकर, रमेश गोटेफोडे, रविभुषण भुसारी, अरूण भेदे, राहुल निर्वाण, भागवत किरणापुरे व प्रा. जयश्री सातोकर यांच्यासह पदाधिकारी व समाजबांधवांचा सहभाग होता. (शहर प्रतिनिधी)