जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना चोख उत्तर द्या
By admin | Published: June 27, 2016 12:39 AM2016-06-27T00:39:49+5:302016-06-27T00:39:49+5:30
भाजप-सेनेची सत्ता स्थापन झाल्या दिवसापासून शासन जनतेला दिलेल्या वचनांच्या पूर्तीसाठी जीवाचे रान करीत आहे.
भाजपचा मेळावा: शोभा फडणवीस यांचे आवाहन
लाखनी : भाजप-सेनेची सत्ता स्थापन झाल्या दिवसापासून शासन जनतेला दिलेल्या वचनांच्या पूर्तीसाठी जीवाचे रान करीत आहे. त्याचे परिणाम दिसायला आता सुरुवात झालेली आहे. विरोधकांच्या पायाखालीच वाळू सरकायला लागली. क्षुल्लक बाबींवरून हेच आहेत का अच्छे दिन म्हणून जनतेची दिशाभूल करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी देशबुडव्या, राज्य बुडव्या राज्यकारण्यांना योजनांचे स्वरुप व उपलब्धी सांगून त्यांचे तोंड बंद होईल असे चोख उत्तर द्यावे, असे आवाहन आमदार शोभा फडणवीस यांनी केले.
लाखनी येथील संताजी मंगल कार्यालयात भाजपा भंडारा जिल्हा सर्व विभाग कार्यकर्ता पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या
याप्रसंगी खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार बाळा काशीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, मच्छीमार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.प्रकाश मालगावे, विदर्भ प्रांत संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, नागपूरचे माजी महापौर माया इनवाते, डॉ.युवराज जमईवार, चैतन्य उमाळकर, सुनिल मेंढे, प्रशांत खोब्रागडे, राजेश बांते, निशीकांत इलमे, इंद्रायणी कापगते, कुंदा वैद्य, प्रदीप पडोळे, प्रकाश बाळबुद्धे, हंसा खोब्रागडे, शिवराम गिऱ्हेपुंजे, धनंजय मोहकर, नितीन कडव, रेखा भाजीपाले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात आमदार वाघमारे यांनी शासनाच्या योजना प्रत्यक्ष जनतेला कशा मिळतील व त्या कोणकोणत्या आहेत याबद्दल मार्गदर्शन केले. आतापर्यंत कोणत्या योजनांचा जनतेला लाभ मिळाला आणि मिळत आह,े अशा योजनांबद्दल कार्यकर्त्यांना माहिती दिली. केवळ दोन वर्षात भाजपाने हे सर्व करून दाखविले अशांचा प्रचार कार्यकर्त्यांनी केला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.
जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांनी जनतेला भाजपाबद्दल विश्वास वाटेल याचा फायदा पक्ष वाढीसाठी निश्चित होईल. त्याकरिता पक्ष शिस्तीप्रमाणे कार्यकर्त्यांनी आपले वर्तन ठेवण्याची आवश्यकता आहे.
यावेळी मुरमाडी (सावरी) चे सरपंच राजेश खराबे यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपात प्रवेश केला. संचालन भरत खंडाईत यांनी तर, आभार प्रशांत खोब्रागडे यांनी मानले. मेळाव्याला जिल्ह्यातून विविध स्तरावरील ५०० कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीची संपूर्ण तयारी लाखनी तालुकाध्यक्ष पद्माकर बावनकर, निरज मेश्राम, महेश आकरे, वाल्मीक लांजेवार यांनी केली होती. (तालुका प्रतिनिधी)