शेतकरी मानधन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:55 AM2019-08-26T00:55:08+5:302019-08-26T00:56:37+5:30
तालुका अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांना १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांला ५५ रुपये तर ४० वर्ष वयाच्या शेतकऱ्याला २०० रुपये दरमहा हप्ता भरावा लागणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेइतकाच केंद्र शासन हप्ता भरणार असल्याने योजना फायदेशीर असल्याचे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या नियोजनास व अंमलबजावणीस जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ आॅगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांची एकत्रितपणे काम करून ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक व अन्य कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषी विभागीय सहसंचालक रवींद्र भोसले यांनी केले.
कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २३ ते २५ ऑगस्टपर्यंत शेतकरी मानधन योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. भंडारा तालुक्यातील बेलगाव येथे आयोजित शिबिराप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी मिलिंद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ अधिकारी आनंद पाल, कृषी पर्यवेक्षक होमराज धांडे, कृषी सहाय्यक हेमलता तिडके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
सहसंचालक भोसले यांनी अधिकाऱ्यांसह, शेतकऱ्यांना योजनेची यावेळी सविस्तर माहिती देवून शेतकरी माधन योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहू नये असा इशारा दिला.
तालुका अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांना १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांला ५५ रुपये तर ४० वर्ष वयाच्या शेतकऱ्याला २०० रुपये दरमहा हप्ता भरावा लागणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेइतकाच केंद्र शासन हप्ता भरणार असल्याने योजना फायदेशीर असल्याचे सांगितले.
जिल्हा कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता येणार असून वयाची ६० वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना मासिक तीन हजार रुपये (निवृत्ती वेतन) देण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नोंदणीसह आवश्यक कागदपत्रे
ग्रामपंचायतीसह सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्रावर शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी सातबारा व ८ अ उतारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक घेऊन नोंदणी करावी. त्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नसून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय सहसंचालक रविंद्र भोसले यांनी केले. योजनेत लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची तरतूद देखील या शेतकरी मानधन योजनेत करण्यात आल्याची माहिती यावेळी अधिकाºयांनी दिली.