शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 06:00 AM2020-03-01T06:00:00+5:302020-03-01T06:00:49+5:30
गत पाच वर्षात आमदारकीची धुरा सांभाळताना अनेकांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र बरेचशे नागरिक शासनाच्या योजनेपासून वंचित राहिल्याचे प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे आज जरी आमदार नसलो तरी माझ्या हातून जनतेची सेवा व्हावी यासाठी सदर उपक्रम राबवित असल्याचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र सरकार व राज्य शासन यांच्यामार्फत अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा होत असते, जरी शासनाद्वारे योजना जाहीर होत असली तरी प्रत्यक्षात मात्र त्या योजनांची अंमलबजावणी होत नाही, अशा योजनेपासून सुशिक्षित बेरोजगार, कामगार, शेतमजूर, अपंग, विधवा आदी वंचीत राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. विकास फाऊंडेशनमार्फत लाभार्थी विकास केंद्र उघडले आहे. या केंद्रामार्फत शासकीय योजनाचा लाभ घ्यावा , असे आवाहन विकास फाऊंडेशनचे संस्थापक तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी केले.
मोहाडी येथे लाभार्थी विकास केंद्राच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन म्हाडा सभापती तारिक कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विकास फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष डॉ. युवराज जमईवार, सभापती विशाखा बांडेबुचे, उपसभापती उमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य चंदू ढेंगे, विकास फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष हंसराज आगाशे, पंचायत समिती सदस्य हरिचंद बंधाटे, निशा कळंबे, जगदीश ऊके, सुनील मेश्राम, सतीश इटनकर, नगरसेवक सेवक चिंधालोरे, रवी देशमुख, मनीषा साठवणे, यादोराव कुंभारे, भूषण गभणे, जगदीश शेंडे, निशा पशिने, रीता भाजीपाले, निखिल खोब्रागडे उपस्थित होते. यावेळी लाभार्थ्यांना योजनांचे माहितीपत्रक देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन सेवक चिंधालोरे यांनीे, तर आभार प्रदर्शन देवेंद्र मलेवार यांनी मानले. कार्यक्रमाला मोहाडी, तुमसर तालुक्यातील अनेक लाभार्थी उपस्थित होते.
वंचितांसाठी पुढाकार
गत पाच वर्षात आमदारकीची धुरा सांभाळताना अनेकांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र बरेचशे नागरिक शासनाच्या योजनेपासून वंचित राहिल्याचे प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे आज जरी आमदार नसलो तरी माझ्या हातून जनतेची सेवा व्हावी यासाठी सदर उपक्रम राबवित असल्याचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले.
लाभार्थ्यांना त्रास नको
केंद्र सरकार व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी कोणत्या योजनेच्या लाभाकरीता, कोणती कागदपत्रे व कोणत्या कार्यालयात अर्जासोबत सादर करावी, याची माहिती सहजरित्या लाभार्थ्यांना मिळावी, हा उदात्त हेतू ठेवून विकास लाभार्थी केंद्राचा शुभारंभ मोहाडी येथे करण्यात आला आहे.