मतदार यादीत नाव नोंदविण्याचे तरुणांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 10:18 PM2018-08-08T22:18:14+5:302018-08-08T22:18:31+5:30
भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. भंडारा जिल्ह्यात हा कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देवून नोंदणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. भंडारा जिल्ह्यात हा कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देवून नोंदणी केली आहे. १ जानेवारी २०१९ ज्यांना वयाची १८ वर्ष पूर्ण होतात अशा सर्व व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे हे यावेळी उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यात सध्या ९ लाख ६० हजार ४४७ मतदार आहेत. पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत २ हजार २०० मृत मतदारांची नावे यादीतून कमी केली असून १० हजार नवीन नावांची नोंदणी झाली आहे.
मतदानस्तरीय केंद्र अधिकाºयांनी घरोघरी जावून हे कार्य केले आहे. जिल्ह्यात ९ लाख ३२ हजार ६३४ मतदार हे छायाचित्र ओळखपत्र असलेले मतदार असून २७ हजार १६८ मतदारांकडे फोटो छायाचित्र ओळखपत्र नाही. अशा मतदारांना यादीतून वगळण्याची कार्यवाही केली जाणार आहे. मतदार यादी दोषमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असून राजकीय पक्षांनी केंद्रस्तरीय एजंट नेमून जास्तीत जास्त मतदार नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
२०१९ ची निवडणूक दिव्यांग सुलभ निवडणूक म्हणून आयोगाने घोषित केली असून या नुसार जिल्ह्यात दिव्यांग मतदार नोंदणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प बनविले आहेत. सोबतच दिव्यांग व्यक्तीच्या सहकार्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. येणाºया निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. या बाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी प्रत्येक बुथस्तरावर व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
प्रारुप मतदार यादी १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर हा असणार आहे. दोन महिन्याचा हा कालावधी अतिशय महत्वाचा असून या काळात नव्याने मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात होऊ शकते यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे.
ज्यांना वयाची १८ वर्ष पूर्ण झाली अशा महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी महाविद्यालयात विशेष नोंदणी अभियान घेण्यात येणार आहे.
अंतिम मतदार यादी ४ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव नोंदविण्याची प्रक्रिया निरंतर असली तरी २०१९ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणूका प्रस्तावित असल्यामुळे अद्यावत मतदार यादीसाठी जास्तीत जास्त नोंदणी होणे आवश्यक आहे. नागरिकांनी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होताच आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करुन घ्यावी. मतदार यादीत नाव नसल्यास मतदान केंद्र अधिकाºयाकडे अर्ज करुन आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले.