मोदी आवास योजनेसाठी १० जुलैपर्यंत अर्ज करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 15:36 IST2024-06-25T15:33:59+5:302024-06-25T15:36:56+5:30
Bhandara : जाणून घ्या लाभार्थी पात्रतेचे निकष काय आहेत

Apply for Modi Awas Yojana by July 10
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी राज्यशासनाने मोदी आवास योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थीना १० जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेअंतर्गत ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी घरकुल योजनेअंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ, दुर्गम भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामाकरिता प्रतिघरकुल १ लाख ३० हजार रुपये व सर्वसाधारण क्षेत्राकरिता प्रतिघरकुल १ लाख २० हजार रुपये अर्थसाहाय्य मंजूर करण्यात येते.
या योजनेअंतर्गत प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत लाभार्थीची निवड करावयाची आहे. ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या लाभार्थीची छाननी तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येईल.
लाभार्थी पात्रतेचे हे आहेत निकष
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा. लाभार्थीचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षे असावे. वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. लाभार्थीचे स्वतःच्या अथवा कुटुंबीयांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे. लाभार्थीकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्यांचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल. लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण, गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा. एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुनश्च योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार नाही. लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या कायम- स्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा.