लाखनी नगरपंचायत येथे पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:37+5:302021-05-29T04:26:37+5:30
उन्हाळ्यात अनेक वॉर्डांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, पावसाळ्यापूर्वीची कामेही अजून झालेली नाहीत. अनेक वाॅर्डांतील गटारी कचऱ्याने तुंबल्या आहेत. तसेच ...
उन्हाळ्यात अनेक वॉर्डांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, पावसाळ्यापूर्वीची कामेही अजून झालेली नाहीत. अनेक वाॅर्डांतील गटारी कचऱ्याने तुंबल्या आहेत. तसेच घनकचरा व्यवस्थापन बरोबर होत नसून अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक अर्जदारांचे घरकुलचे प्रस्ताव मंजुरीविना आहेत; तर अनेकांचे घरकुलाचे अनुदान प्राप्त झालेले नाही. विविध प्रकारच्या दाखल्यांसह, हरकत प्रमाणपत्राकरिता १०-१५ दिवसांचा कालावधी लागत आहे. कार्यालयात आलेल्या अर्जांवर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही. अनेक कामे रेंगाळलेली असल्याने लाखनीच्या जनतेत असंतोष निर्माण होत आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांवर कोणाचाच वचक नसल्यामुळे येथील नगर परिषदेचे अधिकारीही सुस्तावले आहेत. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवरसुद्धा कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे लाखणी शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सन २०१४ मध्ये लाखणी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत मध्ये करण्यात आले. लाखणीची एकूण लोकसंख्या पंधरा हजारांपेक्षा अधिक आहे. याशिवाय लाखनी हे तालुक्यातील सर्वांत मोठी वसाहत असलेले गाव असून तालुक्यातील सर्वच मोठी कार्यालये, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ लाखणी शहरात आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातून लाखनी येथे विविध कार्यालये व इतर कामांकरिता शेकडो लोकांचे रोजच येणे-जाणे असल्यामुळे कोरोना रुग्णांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेच्या प्रलंबित समस्या वेळेत पूर्ण करण्याकरिता लाखणी नगरपंचायत कार्यालयात पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करावेत, असे निवेदन पालकमंत्री विश्वजित कदम व जिल्हाधिकारी संदीप कदम, भंडारा यांना तहसीलदार लाखनीमार्फत देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. विकास गभने, लाखनी शहराध्यक्ष धनू व्यास, ज्येष्ठ नेते राजेश निंबेकर, नागेश पाटील-वाघाये, सचिन भैसारे उपस्थित होते.