बाजार समितीवर होणार प्रशासकाची नियुक्ती
By admin | Published: September 3, 2015 12:26 AM2015-09-03T00:26:42+5:302015-09-03T00:26:42+5:30
तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नियुक्तीकरिता शासनस्तरावर खलबते सुरु असून तालुका उपनिबंधक ..
तुमसर-मोहाडीचा समावेश : राज्य शासनाकडे यादी सादर
तुमसर : तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नियुक्तीकरिता शासनस्तरावर खलबते सुरु असून तालुका उपनिबंधक तथा जिल्हा निबंधकांनी १९ संचालक मंडळातील संचालक संबंधित माहितीचा अहवाल छाननी करून सहकार मंत्र्यांकडे पाठविले आहे. सहा महिन्याची मुदतवाढ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांना येथे मिळाली होती.
तुमसर व मोहाडी तालुक्याकरिता एकच कृषी उत्पन्न बाजार समिती असून विदर्भात हिंगणघाट, नागपूर नंतर तिसऱ्या क्रमांकाची ही बाजार समिती आहे. भंडारा जिल्ह्यात भंडारा, लाखनी, पवनी येथे बाजार समित्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. भंडारा येथे निवडणूक संपन्न झाली. सर्वच बाजार समित्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ राज्य शासनाने घोषित केली होती. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकरिता हालचाली सुरु झाल्या होत्या. जिल्हा निबंधकांनी मतदार याद्या अपडेट करण्याचे निर्देश दिले होते. नंतर येथील निवडणूक थंडबस्त्यात गेली. तुमसरातून एक शिष्टमंडळ मुंबई येथे गेले होते. त्यांनी सहकारमंत्र्यांची भेट घेऊन प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याची मागणी केली होती. सहकार मंत्र्यांनी ती मागणी फेटाळली होती. परंतु नंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी १९ संचालक मंडळाची शिफारस राज्य शासनाकडे केली. नंतर राज्य शासनाच्या सहकार खात्याने त्यास मंजूरी दिली. तो आदेश जिल्हा निबंधकाकडे आला. जिल्हा निबंधकांनी तुमसर येथील तालुका उपनिबंधकांना १९ संचालक मंडळ पदाधिकाऱ्यांची माहितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. उपनिबंधकांनी तसा सविस्तर अहवाल जिल्हा निबंधक, भंडारा यांना दिला. जिल्हा निबंधकांनी आठ दिवसांपूर्वी राज्य शासनाकडे संबंधित अहवाल पाठविला.
तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक उलाढाल १ कोटी २६ लाख असून यातून बाजार समितीला ३ ते ४ कोटींचा शुद्ध नफा होतो. धान व तांदळाची ही प्रसिद्ध बाजारपेठ असून राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू समजले जाते. राष्ट्रीय व राज्य स्तरावर भाजपने सत्ता प्राप्त केली. परंतु बाजार समितीची आज निवडणूक झाली तर भाजप सेनेला येथे निवडणूक जिंकणे सोपे नव्हते. त्यामुळे किमान सहा ते आठ महिने संचालक मंडळाची नियुक्ती करणे असा पर्याय येथे निवडण्यात आला. सहा ते आठ महिन्यात दोन्ही तालुक्यात गावापर्यंत मतदारांशी संपर्क करून पानेमुळे रुजविण्याचा प्रयत्न येथे सत्ताधारी करणार असल्याचे समजते.सध्या या बाजार समितीवर काँग्रेस राकाँचे वर्चस्व आहे. ही मक्तेदार मोडून काढण्याकरिता सहकार क्षेत्रात बिगुल फुंकण्याचा निर्धार स्थानिक भाजपा नेत्यांनी बांधला आहे.
भाजप सेनेचे सक्रीय कार्यकर्ते या संचालक मंडळात असल्याची माहिती आहे. विद्यमान संचालक मंडळाने येथे त्वरीत निवडणुका घ्याव्यात असा मानस व्यक्त केला. परंतु सत्ताधाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)