जिल्हाधिकाऱ्यांच्या उपक्रमाची वनमंत्र्याकडून प्रशंसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2017 12:20 AM2017-07-11T00:20:51+5:302017-07-11T00:20:51+5:30
राज्य शासनाने राबविलेल्या वन महोत्सव उपक्रमात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ....
वृक्ष संवर्धनासाठी बक्षीस योजना : विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनाचा अनोखा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य शासनाने राबविलेल्या वन महोत्सव उपक्रमात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या विद्यार्थी व शाळांना बक्षीस या अभिनव योजनेची दखल राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली असून या उपक्रमाला नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यादीत स्थान दिले आहे.
शासनाच्या वतीने नुकताच राज्यभरात ४ कोटी वृक्ष लागवडीचा वन महोत्सव लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविले असतांना यावर्षी ५ कोटीच्या वर वृक्ष लागवड राज्यभरात करण्यात आली. या वनोत्सवात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या संकल्पनेतून शाळा व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची सुरवात लोकमान्य टिळक शाळेतून जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष लावून केली.
वृक्ष लागवडीच्या या अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन झाड लावण्यासाठी देण्यात आले. विद्याथ्यार्नी ही झाड आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत किंवा परिसरात लावावी आणि त्याचे पुढील तीन वर्षे संगोपन करावे. या सोबतच झाडाच्या वाढीचा अहवाल नियमित शाळेत सादर करावा. या प्रक्रियेत मुलांना झाडाचा अभ्यास होईल व वृक्षाचा लळा लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे वृक्ष संगोपन केले अशा विध्याथ्यार्ना बक्षीस देण्यात येईल. ज्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी वृक्ष संगोपन करतील, त्या शाळेला सुद्धा बक्षीस देण्यात येईल, असा हा उपक्रम आहे.
प्रत्येक शाळा पातळीवर सर्वोत्कृष्ट संगोपनासाठी पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या विद्याथ्यार्ची निवड होणार आहे. लागवड केलेल्या वृक्षांची प्रत्येक महिन्याला घेर, उंची व सद्यस्थितीबाबत मोजमाप घेवून नोंद केली जाणार आहे. १० महिन्यानंतर वृक्षांच्या संगोपनाबाबत प्रतयेक शाळेत वर्गनिहाय व त्यानंतर शाळापातळीवर विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा ५ ते ११ वीच्या विद्यार्थ्यांमध्ये असणार आहे.प्रत्येक शाळेत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ५०० व ३०० रुपये रोख व प्रमाणपत्र दिले जाईल. तालुकास्तरावर प्रथम शाळेला १० हजार रुपये रोख व प्रमाणपत्र तर जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाच्या शाळेला २५ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल राज्याच्या वनमंत्र्यांनी घेतली असून या उपक्रमाचा समावेश नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यादीत केला आहे. वन महोत्सवादरम्यान राज्यभरात राबविलेल्या वेगळ्या व हटके उपक्रमाची यादी वनविभाग तयार करणार आहे. या यादीत भंडारा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचा हा उपक्रम समाविष्ट करण्यात येणार आहे.