कलाउत्सव उपक्रमात ‘स्वर’च्या चित्रकलेला दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:06 AM2021-02-06T05:06:16+5:302021-02-06T05:06:16+5:30
भंडारा : तिचा जन्म कलावंताच्या घरी झाला.जन्मत:च तिला कलावंत म्हणून जगण्याचे बळ मिळाले. ती गाते, ती चित्र रेखाटते, ती ...
भंडारा : तिचा जन्म कलावंताच्या घरी झाला.जन्मत:च तिला कलावंत म्हणून जगण्याचे बळ मिळाले. ती गाते, ती चित्र रेखाटते, ती नृत्यनिपुण आहे. होय बहुआयामी असणारी ही मुलगी आहे. भंडारा शहरातील लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील इयत्ता नववीची विद्यार्थिनी स्वर अभय बंसोड. गायन-वादन नृत्य,अभिनय या सर्वच क्षेत्रांत अमीट अशी छाप असणाऱ्या शहरातले सुप्रसिद्ध कलावंत अभय व श्वेता बंसोड यांची स्वर ही सुकन्या. मागच्या वर्षी स्वरच्या पित्याचे छत्र हरपले, पण खचून न जाता आई श्वेता बंसोड यांनी स्वरला कलावंत म्हणून घडवण्याचा मानस केला. तिच्यातल्या कलासक्त वृत्तीस प्रोत्साहन दिले. त्याचेच फलित हे की, शासनाच्या कलाउत्सव उपक्रमात स्वरच्या चित्रकलेला दाद मिळाली. तिचे द्विमित चित्र स्पर्धेसाठी जिल्हास्तरावरुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले गेले. नागपूरच्या विभागीय चमूने तिची मुलाखत घेतली. मीतभाषी स्वर अभ्यासातही आघाडीवर आहे, हे विशेष. तिच्या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या केसर बोकडे, शिक्षक प्रतिनिधी नामदेव साठवणे,सांस्कृतिक विभाग प्रमुख स्मिता गालफाडे,वर्गशिक्षिका रेखा साठवणे व सर्व शिक्षक वृंदांनी कौतुक केले.
मुलांच्या कलागुणांना वाव देणारा शासनाचा कलाउत्सव हा उपक्रम पाठबळ देणारा आहे, असे मनोगत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामूजी शहारे यांनी व्यक्त केले.