जिल्ह्यातील १२ तीर्थस्थळांना मंजुरी
By Admin | Published: September 8, 2015 12:29 AM2015-09-08T00:29:55+5:302015-09-08T00:29:55+5:30
अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील मंदिरात यात्रेकरूंना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात केलेल्या मागणीची दखल घेत ..
साकोलीत तीन मंदिरांचा समावेश : लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना यश
साकोली : अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील मंदिरात यात्रेकरूंना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात केलेल्या मागणीची दखल घेत खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार व आमदार चरण वाघमारे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाठपुरावा केला. जिल्ह्यातील १२ तीर्थस्थळांना मंजुरी देत सुविधा पुरविण्याचे आदेश दिले असून यात साकोली तालुक्यातील तीन मंदिरांचा समावेश आहे.
भंडारा जिल्ह्यातील रामेश्वर मंदिर लाखांदूर, संत लहरीबाबा मठ देवस्थान साकोली, कृष्णमंदिर मुंढरी, कोकणागड पहाडी भंडारा, गोबरवाही (नागझिरा) तुमसर, काशी मंदिर डोंगरगाव म ोहाडी, भवानी मंदिर कांद्री मोहाडी, हनुमान मंदिर सिल्ली लाखांदूर, श्रीराम मंदिर जांब मोहाडी, कोल्हासूर पहाडी साकोली, दत्त मंदिर मोहाडी व पोगेझरा महादेव देवस्थान साकोली या मंदिरांना आता तिर्थस्थळे म्हणून घोषित करण्यात आली.
ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासननिर्णयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सदर तिर्थस्थळ यात्रास्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यांचेकडून जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे हे आदेश पाठविण्यात आले असून पायाभूत सुविधा देण्यात येणार आहेत.
भंडारा जिल्ह्यातील मंदिरात यापूर्वी लोकवर्गणी करून उत्सव साजरे केले जात होते. या उत्सवादरम्यान भाविकांना सोयी सुविधेअभावी त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पर्यटन यात्रा स्थळाचा विकास यातून हा विकास आता करण्यात येणार आहे. साकोली तालुक्यातील मंदिराचा तीर्थस्थळात समावेश करण्यात यावा यासाठी माजी सभापती गीता कापगते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर सपाटे यांनी खा.पटोले व आ.बाळा काशीवार यांना सातत्याने पाठपुरावा केला होता. (तालुका प्रतिनिधी)
भंडारा जिल्ह्यातील बारा मंदिराचा तीर्थस्थळ म्हणून समावेश करण्यात आला. शासनाकडून लवकरच या तीर्थस्थळांना निधी मिळणार असून या ठिकाणचे मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होणार आहे.
- राजेश काशिवार
आमदार, साकोली.