३ कोटींच्या पेयजल योजनेला मंजुरी
By admin | Published: April 14, 2017 12:31 AM2017-04-14T00:31:06+5:302017-04-14T00:31:06+5:30
राष्ट्रीय ग्रामीण कृती आराखडा नुसार जिल्ह्यातील चार गावात पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम करण्यात येणार आहे.
जि.प. जलव्यवस्थापन समितीचा ठराव : तुमसर तालुक्यात तीन तर पवनीत एका ठिकाणी होणार बांधकाम
भंडारा : राष्ट्रीय ग्रामीण कृती आराखडा नुसार जिल्ह्यातील चार गावात पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी ३ कोटी १२ लाख ८८६ रुपयांच्या योजनेला जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीने मंजुरी दिली.
जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या सभाध्यक्षतेखाली पार पडलेल्या गुरुवारच्या सभेत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या सभेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, समाजकल्याण सभापती विनायक टेकाम, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले यांच्यासह सर्व समिती सदस्य व लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रीय ग्रामीण कृती आराखडा पेयजल योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या गावांमध्ये पवनी तालुक्यातील अड्याळ, तुमसर तालुक्यातील चुल्हाड, देव्हाडी व पाथरी या गावांचा समावेश आहे. अड्याळ येथे या योजनेसाठी ६८ लाख ६ हजार ४०२ रुपये, चुल्हाडसाठी १ कोटी ८ लाख ३४ हजार ८२ रुपये, देव्हाडीसाठी ७१ लाख १ हजार २०१ रुपये व पाथरीसाठी ५३ लाख ७९ हजार २०१ रुपये असा तीन कोटी १२ लाख ८८६ रुपयांचा हा आराखडा मंजूर केला. ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाणीपुरवठा समितीच्या नियंत्रणात यांचे काम व नियंत्रण करण्यात येणार आहे. या महत्वाकांक्षी निर्णयाने अड्याळ, चुल्हाड, देव्हाडी व पाथरी येथील पाण्याच्या संदर्भातील प्रश्न मार्गी लावण्याचा जि.प. अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी सुवर्णमध्य साधला आहे. (शहर प्रतिनिधी)