तुमसर-मोहाडी प्रशासकीय इमारतीला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:07 PM2018-03-31T23:07:42+5:302018-03-31T23:07:42+5:30
एकाच इमारतीत तालुक्यातील सर्वच मुख्य कार्यालये राहावीत आणि प्रशासकीय कामांना गती मिळावी, यासाठी तुमसर आणि मोहाडी या तालुकास्तरावर प्रत्येकी १४ कोटी रूपयांची प्रशासकीय इमारत आमदार चरण वाघमारे यांच्या पुढाकारने होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : एकाच इमारतीत तालुक्यातील सर्वच मुख्य कार्यालये राहावीत आणि प्रशासकीय कामांना गती मिळावी, यासाठी तुमसर आणि मोहाडी या तालुकास्तरावर प्रत्येकी १४ कोटी रूपयांची प्रशासकीय इमारत आमदार चरण वाघमारे यांच्या पुढाकारने होत आहे. या ईमारतीला राज्य शासनाने मंजुरी दिली असून अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे.
तुमसर व मोहाडी तालुक्यात राज्य शासनाची अनेक कार्यालये भाड्याच्या इमारतीत आहेत. प्रशासकीय कामांकरिता अधिकारी व नागरिकांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात जाण्यासाठी त्यांचा वेळ व श्रम जाते. अधिकाºयांनासुद्धा एका कार्यालयातून दुसºया कार्यालयात जाताना त्रास सहन करावा लागतो.
तुमसर व मोहाडी येथे तहसील कार्यालय परिसरात प्रशासकीय इमारत बांधण्याची मागणी आ.चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी या प्रशासकीय इमारतीकरीता प्रत्येकी १४ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. पोलीस विभाग वगळता सर्वच कार्यालये या प्रशासकीय इमारतीत स्थानांतरीत होणार आहेत.
या प्रशासकीय ईमारतीत कृषी विभाग, पंचायत समितीचे कार्यालये, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, वीज वितरण कार्यालय, वनविभाग कार्यालय, जलसंपाद विभागासह अन्य कार्यालयांचा त्यात समावेश राहणार आहे.
२०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रशासकीय इमारतीला निधी मंजूर करण्याची प्रक्रिया पुर्णत्वास आली असून बांधकामाची निविदा लवकरच काढण्यात येत आहे. येत्या वर्षभरात ही प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. ही इमारत बांधकामामुळे राज्य शासनाचे भाड्यापोटी कोट्यवधी रूपयांची बचत होणार असून अधिकारी व नागरिकांना सुविधा होणार आहे.
विकासकामांना गती, नियोजन, अधिकाºयांचे समन्वय व नागरिकांची कामे तातडीने होऊन वेळ व श्रमाची बचत होईल. मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून तुमसर व मोहाडी तालुका मुख्यालयी प्रशासकीय इमारतीला मंजुरी दिली असून कामे लवकरच सुरू होणार आहेत.
-आ. चरण वाघमारे, तुमसर.