तिरोडी-कटंगी रेल्वेमार्ग विस्तारीकरणाला मंजुरी
By admin | Published: April 6, 2017 12:19 AM2017-04-06T00:19:31+5:302017-04-06T00:19:31+5:30
तुमसर - तिरोडी कटंगी रेल्वे मार्ग विस्तारीकरणाला रेल्वे मंत्रालयाने हिरवी झेंडी दिली असून यासाठी ६६ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
६६ कोटींचा निधी मंजूर : मध्य भारताला जोडणारा नागपूर-जबलपूर रेल्वे मार्ग
मोहन भोयर तुमसर
तुमसर - तिरोडी कटंगी रेल्वे मार्ग विस्तारीकरणाला रेल्वे मंत्रालयाने हिरवी झेंडी दिली असून यासाठी ६६ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. मध्यभारतात नागपूर व्हाया तुमसर-जबलपूर येथे कमी वेळेत जाणारा हा रेल्वे मार्ग ठरणार आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात मॅग्नीज वाहतुकीसाठी तुमसर रोड ते तिरोडी हा रेल्वे मार्ग होता. प्रारंभी या मार्गावर दिवसातून एकच प्रवाशी रेल्वे धावत होती. आता तुमसर रोड - तिरोडी पर्यंत रेल्वे ट्रॅक आहे. तर तिरोडी ते कटंगीदरम्यान १२ कि.मी. पर्यंत रेल्वे ट्रॅक नाही. कटंगी ते बालाघाट तथा बालाघाट ते जबलपूर असा रेल्वे ट्रॅक आहे. केवळ १२ कि.मी. चा रेल्वे ट्रॅकअभावी जबलपूर येथे जाता येत नव्हते. तिरोडी कटंगीपर्यंत रेल्वे ट्रॅक पूर्णत्वास आल्यावर नागपूर-जबलपूर असा रेल्वे प्रवास करता येणार आहे.
यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाला मंजुरी देऊन प्रथम टप्प्यात ६६ कोटींचा निधी देण्यात आला. या कामांची निविदा काढण्यात आली आहे. मध्यभारतात स्वस्त व कमी वेळेत जाण्याचा हा एकमेव मार्ग ठरणार आहे. रेल्वे अपघाताप्रसंगी गाड्या रद्द करण्यात येतात. प्रवाशी रेल्वे व्हाया इटारसी मार्गे धावतात. यासाठी सहा तास जास्त लागत होते. अशावेळी जबलपूर - नागपूर रेल्वे मार्ग मैलाचा दगड ठरणार आहे. मागील काही वर्षापासून या रेल्वे मार्ग विस्तारीकरणाची मागणी होती. या रेल्वे मार्गासाठी खा.प्रफुल पटेल, खा.नाना पटोले यांनी प्रयत्न केले, हे विशेष.