साकोली, सेंदूरवाफासाठी स्वतंत्र शुद्ध पाणीपुरवठा योजना मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:40 AM2021-09-23T04:40:44+5:302021-09-23T04:40:44+5:30
साकोली : नगरपरिषद स्थापन होऊन पाच वर्षांचा कार्यकाळ लोटला, मात्र पाच वर्षांत नगरपरिषदेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार होऊ शकली ...
साकोली : नगरपरिषद स्थापन होऊन पाच वर्षांचा कार्यकाळ लोटला, मात्र पाच वर्षांत नगरपरिषदेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार होऊ शकली नाही. त्यामुळे साकोली शहरवासीयांना हातपंप, सार्वजनिक विहीर व घरगुती साधनांवरच आपली तहान भागवावी लागली. आता विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने नुकतीच २१४४ घनमीटर पाण्याला मंजुरी दिल्याने २७ लाख रुपयांची साकोली, सेंदूरवाफा या दोन गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार होणार आहे.
१८ वर्षांपूर्वी साकोली व लाखनी तालुक्यांतील १९ गावांसाठी शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून जीवन प्राधिकरण विभागातर्फे गडकुंभली टेकडीवर जलशुद्धिकरण योजना तयार करण्यात आली. मात्र, जिल्हा परिषदेने ही योजना आपल्याकडे हस्तांतरित केली नाही. जीवन प्राधिकरण विभागालाही जलशुद्धिकरण योजना तयार करून भंडारा जिल्हा परिषदेला हस्तांतरित करायची होती. यासाठी १९ गावांत पाईपलाईन, जलकुंभ तयार करण्यात आले. मात्र, जिल्हा परिषद ही नळयोजना चालवायला तयार नाही. परिणामी ही योजना तसेच धूळ खात पडली असून या योजनेच्या देखभालीसाठी शासनाचे दरवर्षी लाखो रुपये खर्च होत आहेत. साकोली नगर परिषद अस्तित्वात येण्याआधी साकोली व सेंदूरवाफा यांची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना होती. कालांतराने दोन्ही योजना बंद झाल्या. त्यामुळे साकोली व सेंदूरवाफा या गावाला सार्वजनिक व घरगुती बोअरवेल, विहिरीवरच आपली तहान भागवावी लागते. नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर दोन्ही गावांसाठी एक स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार व्हावी, यासाठी नगराध्यक्ष धनवंत राऊत यांनी सुरुवातीपासूनच प्रयत्न केले. या पाणीपुरवठा योजनेसाठी सतत पाठपुरावा केला. मात्र कधी प्रशासकीय अडचण, तर कधी राजकीय, यामुळे साकोलीची पाणीपुरवठा योजना रखडली होती. मात्र, तब्बल पाच वर्षांनंतर का होईना आता या पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या पाण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच ही पाणी पुरवठा योजना तयार होणार आहे.
बॉक्स
अशी असेल योजना
साकोली, सेंदुरवाफा या दोन गावांसाठी नगर परिषदेतर्फे तयार होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेसाठी तीन मोठे जलकुंभ असतील. यापैकी केवळ एकच नवीन जलकुंभ लाखांदूर रोडवर तयार करण्यात येणार आहे, तर उर्वरित दोन जलकुंभ जीवन प्राधिकरण विभागाच्या नागझिरा रोड व प्रगती कॉलनीच्या टेकडीवर करण्यात येणार असून, दोन्ही गावांसाठी नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. तसेच जलशुद्धिकरण केंद्र हे गडकुंभली गावालगत असलेल्या टेकडीवर तयार होणार आहे. या संपूर्ण कामाला जवळपास एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.
बॉक्स
जुनी पाईपलाईन निकामी
अठरा वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरण विभागामार्फत साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गावांत पाईपलाईन टाकण्यात आली होती. मात्र, ही पाईपलाईन आता निकामी झाली असून, शासनाचे यात लाखो रुपये वाया गेले आहेत. योजनेची नवीन पाईपलाईन दोन्ही गावांत टाकण्यात येणार आहे.