एप्रिल हिट : पारा ४०.५ अंशावर
By admin | Published: April 2, 2016 12:34 AM2016-04-02T00:34:13+5:302016-04-02T00:34:13+5:30
एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच सुर्य आग ओकू लागला आहे. होळी संपल्यानंतर सूर्याचा पारा चढत जातो,
देवानंद नंदेश्वर भंडारा
एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच सुर्य आग ओकू लागला आहे. होळी संपल्यानंतर सूर्याचा पारा चढत जातो, असा सर्वमान्य संकेत आहे. मात्र भंडारा शहरासह जिल्ह्यातच मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सूर्याचा पारा चढू लागला आहे. आज कमाल तापमान ४०.५ तर, किमान तापमान २३.५ अंश सेल्सियस नोंदविण्यात आला. उन्हाची काहिली जिल्हावासीयांना आतापासूनच असह्य होऊ लागली आहे.
या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. सिंचन प्रकल्पातही पाणी नाही. ग्रामीण भागातील नदी-नाले, बोड्या, तलाव आटण्याच्या मार्गावर आहेत. अशातच आता उन्हाळ्यालाही जिल्ह्यात लवकरच सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठ दिवसांपासून सूर्य आग ओकू लागल्याचे भासत आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहिली वाढत असल्याने नागरिकांनाही ती असह्य होऊ लागली आहे. मार्च महिन्यातच तीव्र उष्णता जाणवते तर एप्रिल व मे महिन्यात काय हाल होतील, याची चिंता जिल्हावासीयांना लागली आहे.
उन्हाचा पारा सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनीही दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे कमी केले आहे. आवश्यक कामासाठीच नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे दुपारच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील वर्दळ कमी होऊ लागली आहे. सर्वच मार्ग दुपारच्या सुमारास ओस पडल्याचे दिसून येत आहेत. दुपारची वर्दळ कमी झाल्याने सायंकाळी व रात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. नागरिक आपल्या कुटुंबासह खरेदीसाठी सायंकाळीच घराबाहेर पडताना दिसून येत आहेत.
पाण्याची पातळी खालावली
दुसरीकडे उन्हाची काहिली वाढल्याने पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. नदी-नाले, तलाव तर आटण्याच्या मार्गावर आहेच; शिवाय ग्रामीण भागातील जलस्त्रोत असलेल्या विहिरी, बोअरवेल यांचे पाणीही कमी होत आहे. अनेक गावांत आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवत आहे. अनेक ठिकाणी लोक पाण्यासाठी एक-दोन किलोमीटरची पायपीट करताना दिसत आहेत.
मडक्यांची मागणी वाढली
उन्हाची काहिली वाढली की थंड पाणी मोठा आधार वाटतो. त्यामुळे मडक्यांची मागणी वाढते. आताही येथील कुंभार टोलीत नागरिकांची माठ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. अनेक छोटे व्यावसायिक, गोरगरीब नागरिक फ्रिज घेण्याच्या भानगडीत न पडता माठातच पाणी ठेवतात. त्यामुळे सध्या माठांच्या किमतीही वधारल्या आहेत.
जिल्ह्यात 'हिट अँक्शन प्लॅन'
वाढलेल्या तापमानामुळे सर्व सामान्य नागरिक व मेहनतीचे काम करणाऱ्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी आणि निवाऱ्याकरीता शेडची व्यवस्था करण्यात यावी. तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून रुग्णालयामध्ये तात्काळ उपचारासाठी शीतकक्षाची निर्मिती करावी, नगर परिषद भंडारा, पवनी आणि तुमसर या शहरी भागात नागरिकांना पिण्यासाठी पाणी, सार्वजनिक प्याऊ तसेच उन्हात निवाऱ्याच्या जागा निश्चित करण्यात याव्यात. सेतू केंद्र , बसस्थानक, रेल्वे स्टेशन तसेच सर्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या लोकांना रांगेत उभे राहण्यासाठी शेडची व्यवस्था विभाग प्रमुखांनी करावी. फुटपाथ बसस्थानक येथे झोपणाऱ्या व्यक्ती तसेच आजारी व्यक्ती यांच्याकडे लक्ष ठेवून त्यांना गरज असल्यास उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करावे. नागरिकांनी रुग्णवाहिकेची सेवा मिळविण्यासाठी १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा , अशा सूचना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिल्या आहेत
उष्णतेपासून उष्माघाताची शक्यता असते. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उष्माघाताच्या उपचारासाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे. उपचारासाठी औषधाचा मुबलक साठा आहे. रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टरांसह परिचारिका तैनात आहेत. या कक्षात रुग्णांना गारवा मिळावा, यासाठी कक्ष वातानुकुलीत करण्यात आले आहे.
- देवेंद्र पातुरकर,
जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा.
गारपीटची शक्यता
येत्या पाच ते सात एप्रिल दरम्यान विदर्भासह भंडारा जिल्ह्यात गारपिठसह पाऊस पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. यापूर्वी मार्च महिन्यात दोनदा अकाली पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात बदल झाला.