पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी शासकीय पाहुणचार घेत आहेत काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 09:19 PM2018-08-24T21:19:03+5:302018-08-24T21:19:34+5:30
जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरी, रेती तस्करीचे प्रमाण वाढत आहे. परंतु पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून सर्व काही सुरळीत असल्याची भूमिका घेत आहे. ३१ जुलैच्या मध्यरात्री सात रेती तस्करांनी चार पोलिसांवर हल्ला करूनही पोलीस विभाग आरोपींना शोधू शकला नाही. २५ दिवस होऊनही हे आरोपी सापडू शकले नाहीत ते शासकीय पाहुणचार घेत आहेत का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरी, रेती तस्करीचे प्रमाण वाढत आहे. परंतु पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून सर्व काही सुरळीत असल्याची भूमिका घेत आहे. ३१ जुलैच्या मध्यरात्री सात रेती तस्करांनी चार पोलिसांवर हल्ला करूनही पोलीस विभाग आरोपींना शोधू शकला नाही. २५ दिवस होऊनही हे आरोपी सापडू शकले नाहीत ते शासकीय पाहुणचार घेत आहेत का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.
२५ दिवसांपूर्वी मोहाडी तालुक्यातील रोहा शिवारात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना काही रेती तसकरांनी पोलिसावर जीवघेणा हल्ला केला. आता पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी पोलिसांनाच सापडत नसतील तर सामान्य नागरिक कसे सुरक्षित राहणार? असा सवालही नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. भंडारा या शांत जिल्ह्यात कधी नव्हे इतकी वाईट परिस्थिती राज्य सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे ओढवली आहे. या प्रकाराला राज्य सरकारचे गृहखातेच जबाबदार असून खतपाणी घालत आहे.
एखाद्या घटनेचा गांभीर्याने शोध घेणाऱ्या भंडारा पोलिसांना हल्ला करणारे आरोपी कसे सापडू शकत नाही, हे आश्चर्यकारक म्हणावे असे आहे. या आरोपीमध्ये भाजपच्या पदाधिकाºयाचा समावेश आहे. एकीकडे गुंडांना पाठीशी घालत नाहीत, असे सांगणारे मुख्यमंत्री गुंड प्रवृत्तीच्या आरोपीना पाठिशी कसे घालत आहेत, असा प्रश्न करून भाजपात गुंडांना अभय असल्याचा आरोप केला आहे. मागील २५ दिवसापासून गंभीर गुन्ह्याचे हे आरोपी सापडत नसतील तर या घटनेला आणि आरोपींना गृहविभागच आश्रयदाते ठरत आहेत, असा गंभीर आरोपही नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.
चप्राड मंदिरातील दानपेटी चोरटे मोकाटच
लाखांदूर तालुक्यातील चप्राड पहाडीवर असलेल्या देवीच्या मंदिरातील दानपेटी फोडून भाविकांनी घातलेले दान चोरट्यांनी नेले. परंतु पोलिसांना या प्रकरणातील आरोपी अद्याप सापडले नाही, चोरी, हल्ले असे प्रकार घडत असतानाही पोलिसाना आरोपीचा शोध लावता आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शांतता भंग पावली आहे.