वाहनातून मतदार आणल्यावरून दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोहाडीत राडा

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: November 20, 2024 06:12 PM2024-11-20T18:12:13+5:302024-11-20T18:16:33+5:30

मतदान केंद्रासमोरच हाणामारी : शिघ्रकृती दलाचे पथक आले धावून

Argument between two party workers over bringing voters by vehicle | वाहनातून मतदार आणल्यावरून दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोहाडीत राडा

Argument between two party workers over bringing voters by vehicle

मोहाडी : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये असलेल्या मतदान केंद्रावर मतदानादरम्यान सायंकाळी ४ वाजता दोन प्रमुख पक्षाच्या कार्यकर्त्यात हाणामारी झाली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आणि काही वरिष्ठ सामाजिक मंडळींनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही कार्यकर्ते मतदान केंद्राच्या मैदानात दिसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला. यावरून दोन्ही गटात बाचाबाची सुरू झाली. पाहता पाहता शंभर दीडशेच्या जवळपास कार्यकर्ते मतदान केंद्राच्या आवारात गोळा झाले. दोन तीन कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली.

हा प्रकार सुरू असताना केवळ पाच-सहा पोलिसच केंद्रावर तैनात होते. त्यामुळे त्यांना ही परिस्थिती हाताळणे अवघड झाले. त्याचवेळी मतदान केंद्रातून मतदारांना घेऊन एक चार चाकी वाहन बाहेर येताना दिसले. यामुळे कार्यकर्त्यांचा पारा पुन्हा वर चढला. पुन्हा आक्रोश वाढला. वाहन आत कसे येऊ दिले असा प्रश्न उपस्थित झाल्याने वाद पुन्हा वाढला. या दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली. या प्रकाराची माहिती वरिष्ठांना कळविल्यावर कृती दलाचे पथक पोहचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून जमावाला पांगविले. पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनीही तातडीने घटनास्थळ गाठून माहिती घेतली आणि वातावरण शांत केले.

या प्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हे दाखल झालेले नाहीत, अथवा कुणाला ताब्यातही घेण्यात आलेले नाही. या संदर्भात पोलिस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, घटनेची संपूर्ण माहिती घेऊन संबंधितांवर गुन्हे नोंदविले जातील, असे सांगण्यात आले.

Web Title: Argument between two party workers over bringing voters by vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.