जनावरांच्या पाण्यावरून वाद, मोठ्या भावाचा लहानावर फावड्याने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 01:34 PM2023-05-24T13:34:07+5:302023-05-24T13:36:18+5:30
लाखांदूर तालुक्यातील घटना
भंडारा : जनावरांना पाणी पाजण्याच्या डोंगीवरून दोन भावात झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावावर फावड्याने हल्ला करून जखमी केली. ही घटना मंगळवारी, २३ मे रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथे घडली.
जखमी भावाचे नाव राजेश्वर दयाराम बगमारे (३७) असे असून लाखांदूर पोलिसांनी तक्रारीवरून संजू दयाराम बगमारे (३९) या मोठ्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रानुसार, संजू व जखमी राजेश्वर दोघे सख्खे भाऊ असून त्यांच्यात घरगुती वादावरून मागील एक वर्षापासून बोलणे बंद आहे. घटनेच्या सायंकाळी जखमी राजेश्वराने त्याची पत्नी भारतीला संजूकडे आपली डोंगी आहे, उद्या आपल्याला शेळ्या घ्यायच्या असल्याने त्यांच्याकडून डोंगी मागून आण असे सांगितले. पत्नीने तुम्हीच मागा, असे सूचविले. यामुळे राजेश्वर मोठा भाऊ संजूकडे डोंगी मागण्यासाठी गेला. संजूने डोंगी फोडली असे सांगितले. त्यामुळे का फोडली, असा जाब राजेश्वरने विचारला. यावरून दोन्ही भावांमध्ये वाद झाला. या वादातच मोठा भाऊ संजूने लहान भाऊ राजेश्वरच्या डोक्याच्या उजव्या बाजूला फावड्याने मारून जखमी केले.
घटनेनंतर राजेश्वरच्या पत्नीने पोलीस पाटलांना माहिती देत जखमी राजेश्वरला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या राजेश्वरवर लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. राजेश्वरची पत्नी भारती बगमारे यांच्या तक्रारीवरून संजू बगमारे यांच्या विरोधात भादंवीचे कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.