देऊळगावच्या सरपंचपदी अर्जुन ऊईके कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:40 AM2021-07-14T04:40:22+5:302021-07-14T04:40:22+5:30
जांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील देऊळगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच अर्जुन ऊईके यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता, मात्र ...
जांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील देऊळगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच अर्जुन ऊईके यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता, मात्र आयोजित ग्रामसभेत २६४ मते मिळवून ऊईके यांनी विश्वासमत जिंकून सरपंचपद कायम ठेवले आहे. सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच काम करीत असल्याचा आरोप करीत सदस्यांनी मासिक सभेत अविश्वास प्रस्तावाचा ठराव मंजूर करून तहसीलदार मोहाडी यांना सादर केला होता. त्यानुसार तहसीलदार यांनी अविश्वास ठरावासाठी ग्रामसभेचे आयोजन केले होते. त्यामध्ये सरपंच अर्जुन ऊईके यांना २६४ मते मिळाली, तर अविश्वासाच्या बाजूने १ ९० मते मिळाल्याने सरपंचावरील अविश्वास जनतेनी नाकारून विरोधकांना चांगली चपराक लगावली. सरपंच अर्जुन ऊईके यांना सरपंचपदी कायम ठेवले आहे. विश्वास मताच्या बाजूने २६४ मते पडली, तर अविश्वासच्या बाजुने १९० मते मिळाल्याने पीठासन अधिकारी तहसीलदार बोबुरडे यांनी सरपंच अर्जुन उईक यांनी विश्वास मत जिंंकल्याचे घोषित करून सरपंचपदी ऊईके कायम असल्याचे सांगितले. यावेळी खंडविकास अधिकारी वंजारी, विस्तार अधिकारी तेलमासरे, नायब तहसीलदार सोनकुसरे, ग्रामसेवक भारत जिभकाटे हे उपस्थित होते. अर्जुन ऊईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरपंच होते. परंतु त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास घेतल्याने सरपंचानी भाजप व विकास फाउंडेशनमध्ये सामील झाले. राष्ट्रवादी पक्षाचा सरपंच भाजपच्या गळाला लागून भाजपवासी झाल्याने स्थानिक कार्यकर्त्यात कमालीचा उत्साह वाढला आहे.
सरपंच अर्जुन ऊईक यांनी आपल्या विजयाचे श्रेय विकास फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी आ. चरण वाघमारे यांना दिले आहे.