वैमनस्यातून सशस्त्र हल्ला
By admin | Published: November 20, 2015 01:22 AM2015-11-20T01:22:33+5:302015-11-20T01:22:33+5:30
जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोन युवकांनी एका दुकानावर सशस्त्र हल्ला केला. हल्ला करणारे व फिर्यादी यांच्यात झालेल्या झटापटीत चार जण जखमी झाले.
वरठी येथील घटना : हल्ल्यात चार जखमी, तपास सुरू
वरठी : जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोन युवकांनी एका दुकानावर सशस्त्र हल्ला केला. हल्ला करणारे व फिर्यादी यांच्यात झालेल्या झटापटीत चार जण जखमी झाले. ही घटना बुधवारला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डॉ.आंबेडकर चौकात अरूण वासनिक यांचे भांडे विक्रीचे दुकान आहे. सकाळपासून ते दुकानात होते. आठवडी बाजाराचा दिवस असल्यामुळे अरुण वासनिक यांचे प्रदीप व संदीप ही दोन मुले दुकानात होते. दुपारच्या वेळी वरठी येथील साजन देशभ्रतार व पाचगाव येथील राजेश शहारे हे दुकानात येऊन सशस्त्र हल्ला केला. हल्लेखोरांचा बचाव करताना त्यांच्यात हाणामारी झाली. यात दुकानदार अरुण वासनिक, प्रदीप वासनिक व साजन देशभ्रतार आणि राजेश शहारे हे जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटात अनेक दिवसांपासून वाद होता. दोन वर्षापुर्वी राजेश शहारे यांच्यासोबत पाचगाव येथे भांडण झाले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी आज हा हल्ला केल्याचे समजते. मागीलवर्षी साजन देशभ्रतार यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. त्यातून तो बचावला. आजच्या घटनेचे नेमके कारण कळू शकले नाही. परंतु जुन्या वैमनस्यातून हे भांडण झाले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती शेंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शरद कदम, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम गभने करीत आहेत. (वार्ताहर)