पुरात ५१ हजार धानाची पोती गेली वाहून; लाखोंचे नुकसान, पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2022 03:34 PM2022-08-25T15:34:04+5:302022-08-25T16:00:27+5:30
तुमसर तालुक्यातील घटना; भिजलेले चार हजार कट्टे झाले खराब
माेहन भोयर
तुमसर (भंडारा) : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचा फटका तालुक्यातील पिपरा येथे आधारभूत धान खरेदी केंद्राला बसला असून, पुराच्या पाण्यात ५१ हजार क्विंटल धान पोती वाहून गेल्याचे पुढे आले आहे. चार हजार कट्टे धान पाण्यात भिजून ओले झाल्याने खराब झाले आहे.
तालुक्यातील पिपरा गावाशेजारी मोठा नाला आहे. या नाल्याशेजारी संत रविदास मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे आधारभूत धान खरेदी केंद्र आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान या केंद्रात ठेवण्यात आला होता. मात्र, या नाल्याला गत आठवड्यात पूर आला. रात्रीच्या सुमारास सुमारे ५१ हजार धानाची पोती पुरात वाहून गेली, तर उर्वरित सुमारे चार हजार पोती पाण्यात भिजून खराब झाली आहेत, असे ग्राम अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात नमूद केले आहे.
लाखोंचे नुकसान, भरपाईचे काय?
पूर उलटून एक आठवडा झाला तरी आजही विदारक वास्तव पिपरा येथे दिसत आहे. पुरामुळे धान खरेदी केंद्र संचालकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. धान खरेदी केंद्र संचालकांवर आभाळ कोसळले आहे. धान वाहून गेल्यामुळे त्याची नुकसानभरपाई मिळेल काय, या चिंतेत आहेत. तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी संस्थाचालक नितीन भोंडेकर यांनी केली आहे.