कृषी, घरगुती व व्यावसायिक वीज ग्राहकांवर २६७ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:36 AM2021-02-16T04:36:25+5:302021-02-16T04:36:25+5:30
भंडारा : कोरोना संकट काळापासून वीजबिलांचा भरणा योग्य प्रमाणात न झाल्याने वीज वितरण कंपनी संकटात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...
भंडारा : कोरोना संकट काळापासून वीजबिलांचा भरणा योग्य प्रमाणात न झाल्याने वीज वितरण कंपनी संकटात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे एकट्या भंडारा जिल्ह्यातील कृषी, व्यावसायिक तसेच औद्योगिक वीज ग्राहकांकडे तब्बल २६७ कोटी ७३ लक्ष रुपयांची थकबाकी आहे.
भंडारा जिल्ह्यात एकूण ३ लक्ष ३५ हजार ६४१ विद्युत ग्राहक आहेत. यात भंडारा विभागात सर्वच प्रकारच्या विद्युत ग्राहकांची संख्या २ लक्ष २२ हजार ६९९ असून साकोली उपविभागात विद्युत ग्राहकांची संख्या १ लक्ष १२ हजार ९४२ आहे. यात भंडारा ग्रामीण क्षेत्रात एकूण ग्राहकांची संख्या ४३ हजार ७२९ असून त्यांच्यावर ३० कोटी २ लाख ५६ हजार रुपयांचे थकबाकी आहे.
भंडारा शहरी क्षेत्रात ३४ हजार ४८९ विद्युत ग्राहक असून त्यांच्यावर ५ कोटी ५० लक्ष रुपयांची वसुली येणे बाकी आहे. मोहाडी तालुक्यात ४० हजार ६३९ सर्व प्रकारचे विद्युत ग्राहक असून त्यांच्यावर ३० कोटी ९५ लक्ष ८७ हजार रुपयांची थकबाकी आहे. पवनी तालुक्यात ४८ हजार २२१ वीज ग्राहक असून त्यांच्यावर ५६ कोटी ७८ लाख ७६ हजार रुपयांची थकबाकी येणे बाकी आहे. तुमसर तालुक्यात ५५ हजार ६२१ वीज ग्राहक असून ४१ कोटी ९० लाख ८६ हजार रुपयांची थकबाकी बाकी आहे.
साकोली उपविभागांतर्गत लाखांदूर तालुक्यात ३३ हजार ४९७ वीज ग्राहक असून त्यांच्यावर ३३ कोटी ९८ लक्ष ९९ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. लाखनी तालुक्यात ३८ हजार ५०२ वीज ग्राहक असून त्यांच्यावर ३३ कोटी २८ लक्ष २७ हजार रुपयांची वसुली करणे अपेक्षित आहे. साकोली उपविभागांतर्गत एकूण ४० हजार ९४३ विद्युत ग्राहक असून ३५ कोटी २७ लाख ६७ हजार रुपयांची वसुली करायची आहे. सर्वात जास्त वसुली कृषीपंपधारकांकडे दिसून येते. त्यानंतर घरगुती वीज ग्राहकांचा क्रमांक लागतो.
सर्वाधिक थकबाकी पवनी तालुक्यात
पवनी तालुक्यात घरगुती वीजधारकांची संख्या ३६ हजार ५५८, व्यावसायिक वीज ग्राहकांची संख्या १ हजार ७८६, औद्योगिक ४४६ तर कृषीपंपधारकांची संख्या ९ हजार ४३१ इतकी आहे. पवनी तालुक्यात सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांकडून ५६ कोटी ७८ लक्ष ७६ हजार रुपयांची थकबाकी आहे. यात घरगुती वीज ग्राहकांकडे ४ कोटी १० लक्ष, व्यावसायिक ४२ लक्ष, औद्योगिक वीज ग्राहकांकडे २९ लक्ष ६१ हजार तर कृषीपंपधारकांकडे ५१ कोटी ९६ लक्ष ६४ हजार रुपयांची थकबाकी आहे. भंडारा व साकोली तालुक्यातून जास्त थकबाकी ही पवनी तालुक्यात आहे.
थकबाकीत व्यावसायिक नंबर एक
विद्युत देयक थकबाकीअंतर्गत व्यावसायिक वीज ग्राहकांपैकी भंडारा शहरी क्षेत्रात व्यावसायिक वीज ग्राहकांवर ९७ लक्ष ४२ हजार रुपयांची थकबाकी आहे. भंडारा शहरी क्षेत्रात सर्वाधिक ग्राहक थकबाकीदार आहेत. भंडारा शहरी क्षेत्रात ४ हजार २२७ व्यावसायिक वीजधारक आहेत. तसेच साकोली उपविभागात एकूण व्यावसायिक वीज ग्राहकांची संख्या ३६२६ असून त्यांच्यावर ६३ लक्ष ९८ हजार रुपयांची थकबाकी आहे. भंडारा ग्रामीण क्षेत्रात व्यावसायिक वीजधारक ग्राहकांची संख्या १६८१ असून त्यांच्यावर ६५ लक्ष २६ हजार रुपयांची थकबाकी आहे.