पिपरी येथील प्रकरणात आरोपीला अटक करा
By Admin | Published: June 24, 2016 01:23 AM2016-06-24T01:23:59+5:302016-06-24T01:23:59+5:30
ग्राम पंचायत कार्यालय पिपरी येथे आशा स्वयंसेविका कार्यमुक्त करण्याच्या मुद्यावर सरपंच शोभा कारेमोरे यांनी विशेष ग्रामसभा बोलावली होती.
रिपब्लिकन सेनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन : प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष
जवाहरनगर : ग्राम पंचायत कार्यालय पिपरी येथे आशा स्वयंसेविका कार्यमुक्त करण्याच्या मुद्यावर सरपंच शोभा कारेमोरे यांनी विशेष ग्रामसभा बोलावली होती. यात दोन पदापैकी एका पदाचा राजीनामा देण्याबाबद तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पत्राच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात याचिक दाखल केल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ग्रामपंचायत सदस्य व आशा सेविका कुंदा चवरे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला.
दोन दिवसांची मुदत मागितली. यावरून वादंग झाल्याने सदर प्रकरणातील आरोपीला अटक करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
भंडारा तालुक्याच्या पश्चिम सिमेवर असलेल्या पुनर्वसीत ग्रामपंचायत पिपरी येथे १८ जून ला सकाळी ११ वाजता सरपंच शोभा कारेमोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलाविण्यात आली होती.
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी भंडारा यांच्या पत्राच्या अनुषंगाने चर्चेला सुरूवात करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्या तथा आशा स्वयंसेविका पदावर कुंदा नाशिक चवरे या कार्यरत आहेत. यापैकी एका पदाचा राजीनामा द्यावा, अशी ग्रामसभेत मागणी करण्यात आली.
यावेळी कुंदा चवरे यांनी सभेत दोन दिवसांची मुदत देण्यात यावी, अशी मागणी केली. तदनंतर स्वखुशीने एका पदाचा राजीनामा देणार असल्याचे आश्वासन ग्राम सभेपुढे दिले.
यावर सरपंच व सभा अध्यक्ष शोभा कारेमोरे यांनी दोन दिवसांचा अवधी देण्यात येईल असे सभा अध्यक्षांनी जाहीर केले. लगेच उपस्थित उपसरपंच महेश कारेमोरे यांनी कोणत्याही प्रकारची अवधी मिळणार नाही असे बोलून कुंदा चवरे यांना जातीवाचक शिव्या देवून मारहाण केली.
यामध्ये शंकर सार्वे, दिगांबर गाढवे, नानाजी कारेमोरे, विष्णु कारेमोरे यांनीही जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबद आरोपीविरूद्ध अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा कायदा २०१६ कलम ४ (१) आर व कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
सदर घटना घडून सहा दिवस लोटून गेले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आरोपी गावामध्ये मोकाट फिरत आहेत. आरोपींना त्वरीत अटक न केल्यास रिपब्लिकन सेवा जिल्हा भंडाराच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यादरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांना २२ जून रोजी अचल मेश्राम, नाशिक चवरे, अरुण मस्के, श्रीराम बोरकर, राहुल बडोले यांच्या सह्यानिशी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)