अवैध दारू विक्रेत्याची धरपकड मोहीम जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:42+5:302021-05-29T04:26:42+5:30
वरठी : पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी, विदेशी व हातभट्टी दारू विक्री व्यवसाय जोमात सुरू आहे. वरठी येथे घराघरांत ...
वरठी : पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी, विदेशी व हातभट्टी दारू विक्री व्यवसाय जोमात सुरू आहे. वरठी येथे घराघरांत सर्रास अवैध दारू विक्री केली जाते. यामुळे नागरिकांत कमालीचा रोष पसरला असून, तक्रारी वाढल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारीनुसार पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले असून, अवैध दारू विक्रेत्यांची धरपकड मोहीम सुरू केली आहे. वरठी, नेरी, पिंपळगाव, बीड व सोनुली येथे टाकलेल्या धाडीत पाच अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र दारू कायद्याअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अवैध दारू विक्री व उत्पादन करण्यास वरठी पोलीस ठाण्याची हद्द सुरक्षित समजली जाते. परिसरात असलेले शेतशिवार, नदीचे काठ व खुल्या मैदानाचा वापर हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी केला जातो. दारू विक्री व उत्पादन व्यवसायांत अनेक मातब्बर गब्बर झाले आहेत. राजकीय वरदहस्त व पोलिसांच्या सहकार्य असल्याने सर्व आलबेल सुरू आहे. गावात अवैध दारू विक्रीने कळस गाठल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. एका आठवड्यात जवळपास १५ दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याने दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र उभे केले जात आहे; पण धरपकड मोहीम सुरू असूनही वैध दारू विक्रीला ब्रेक लागलेला नाही. वरठी येथे चौकाचौकांत अवैध दारू विक्री धडाक्यात सुरू आहे. धडक कारवाई असूनही गावातील विक्रेते मोकाट असल्याने नागरिकांत संभ्रम आहे.
सोनुली शेतशिवारात टाकलेल्या धाडीत नीतेश मेश्राम यांच्यावर कारवाई करून ३६ हजार ८५० रुपये किमतीचा मोहाचा सडवा नष्ट करण्यात आला. नेरी येथून शुभम पालांदूरकर यांच्याकडील ७१६ रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. नेरीलगतच्या सूर नदीच्या पात्रातून शिशुपाल मांडवे त्यांच्याकडून २१ हजार किमतीचे मोहापास व गांधी वॉर्ड, वरठी येथील शिवचरण शहारे यांच्याकडून १३ हजार रुपये किमतीचे मोहफुलाची दारू आणी बिडसीतेपार येथील विजय अशोक शहारे यांच्याकडून १ हजार २०० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांच्या निर्देशानुसार सदर कारवाई पोलीस हवालदार गुलाब भोंदे, त्रिमूर्ती लांडगे, घनश्याम गोमासे, सचिन गभने, संदीप बांते, आकांत रायपूरकर, नितीन भालाधरे, रेहान पठाण, शेषराव राठोड, राजेश वैद्य, प्रेमनाथ डोरले यांनी केली.
बॉक्स
मुख्य सूत्रधार मोकाट
पोलिसांच्या धडक कारवाईचा धसका कारवाईतून दिसत असला तरी परिसरात दारू विक्रीला फरक पडलेला दिसत नाही. धरपकड मोहीम सुरू असूनही गावातील दारू विक्रेते बिनधास्त दारू विकत आहेत. पोलिसांच्या कारवाईत छोटे मासे गळाला लागले असून, अजूनही मुख्य सूत्रधार मोकाट आहेत. या व्यवसायात अनेक गब्बर असून पोलिसांच्या सरळ संपर्कात असल्याने ते कारवाईतून सुटल्याची चर्चा सुरू आहे. कारवाईत सापडलेले दारू विक्रेते हे लक्ष्य करून अडकवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. अवैध हातभट्टी व्यवसायात गब्बर म्हणून ओळखले जाणारे अजूनही खुलेआम फिरत असल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे.