कामगार संघर्ष यात्रेचे भंडाऱ्यात आगमन
By admin | Published: June 3, 2015 12:42 AM2015-06-03T00:42:12+5:302015-06-03T00:42:12+5:30
वितरण, पारेषण व निर्मिती कंपनीची नियमित कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वर्कर्स फेडरेशनने सोमवारपासून संघर्ष...
मागण्यांसाठी जागृती : मुख्यालयासमोर प्रचारसभा
भंडारा : वितरण, पारेषण व निर्मिती कंपनीची नियमित कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वर्कर्स फेडरेशनने सोमवारपासून संघर्ष यात्रा सुरु केलेली आहे. येथील मुख्यालयासमोर या यात्रेचे आगमन होऊन प्रचारसभा घेण्यात आली.
राज्यात उर्जाक्षेत्रात कार्यरत महावितरण कंपनीचे विदर्भ, मराठवाडा, कोकण व पश्चिम महाराष्ट्र अशा चार विभागीय वीज कंपन्या स्थापित करण्याचे धोरण राज्याच्या उर्जामंत्र्यांनी जाहीर केले. त्याचा निषेध केंद्रीय कृषी समितीने व्यवस्थापनास व्यक्त केला आहे. यावर प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. यामुळे वीज कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
प्रादेशिक विभागीय वीज कंपन्या स्थापित करण्याचे धोरण मागे घ्यावे, फिडर फ्रेंचाईसी विषयावर संघटनांशी चर्चा करावी, तिन्ही कंपन्यातील बदली धोरण संघटनांशी चर्चा करून ठरवावे, मय्यत कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर शैक्षणिक पातळीवर कायम पदावर नेमणूक द्यावी आदी मागण्या मांडण्यात याव्या. या सभेला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीक सिटी वर्कर्स फेडरेशनचे पदाधिकारी आणि वितरण कंपनीतील कर्मचारी उपस्थित होते. यानंतर जिल्ह्यातील विविध कार्यालयातील वीज कर्मचाऱ्यांमध्ये १ ते १० जून दरम्यान प्रचार करण्यात येणार असल्याचे संघटनेचे पदाधिकारी नंदकिशोर भट यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)