पंधरा दिवसांपासून आरो मशीन नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:37 AM2021-02-24T04:37:02+5:302021-02-24T04:37:02+5:30
पालांदूर : पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी स्थानिक पंचायतचे आहे.पाणी हे जीवन आहे.जनतेच्या आरोग्यासाठी शासन व प्रशासन स्तरावरुन ...
पालांदूर : पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी स्थानिक पंचायतचे आहे.पाणी हे जीवन आहे.जनतेच्या आरोग्यासाठी शासन व प्रशासन स्तरावरुन लक्ष पुरविण्याचे धोरण असताना स्थानिक प्रशासन अर्थात ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी नागरीकांना धावपळ करावी लागत आहे.
लाखनी तालुक्यातील किटाडी येथील ग्रामपंचायतच्या आरो मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे गत दोन आठवड्यांपासून आरो मशीन बंद असल्याची गावकऱ्यांची ओरड आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून शासन कोटय़वधी रुपये खर्च करते. मात्र ग्रामिण भागातील पाण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. शुद्ध पाण्याअभावी ग्रामिण भागातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. ग्रामस्थांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी त्यांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असते. मात्र स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ग्रामपंचायत गावची मुख्य संस्था म्हणून ओळखली जाते. ग्रामपंचायत कडून गावात शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते. मुख्यतः ग्रामसेवक यांनी स्वतः लक्ष देणे नितांत गरजेचे आहे. मात्र त्यांचेच सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. गावातील ब-याच घरी आरो मशिनचे शुद्ध पाणी वापरले जाते. मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ग्रामस्थांना पाण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे. पुढे अशीच परिस्थिती राहिल्यास पाण्याची भिषण समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. वेळीच ग्रामपंचायतने तत्परता दाखवित उपाययोजना करावे अशी अपेक्षा आहे. उन्हाळ्याच्या पूर्वसंध्येला पाणीटंचाई भासू नये याकरिता वेळीच काळजी घेणे गावी त्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.
तांत्रिक कारणामुळे सदर आरो प्लांट बंद आहे. दुरुस्तीच्या अनुषंगाने पत्रव्यवहार केलेला आहे. येत्या तीन-चार दिवसात दुरुस्तीचे नियोजन केले आहे.
जय आकरे
ग्रामसेवक किटाडी