थकीत विद्युत बिल व दुरुस्तीअभावी दोन वर्षांपासून आरो प्लांट बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:25 AM2021-06-03T04:25:37+5:302021-06-03T04:25:37+5:30
करडी (पालोरा) : देव्हाडा बुज येथे दोन वर्षांपूर्वी गावातील प्रत्येक नागरिकाला शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या ...
करडी (पालोरा) : देव्हाडा बुज येथे दोन वर्षांपूर्वी गावातील प्रत्येक नागरिकाला शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उदात्त हेतूने ग्रामपंचायत सामान्य फंडातून तीन लक्ष रुपये खर्चून बाजार चौकात हजारो लीटर क्षमतेच्या शुध्द पाण्याचा आरो प्लांट उभारण्यात आला. परंतु आज थकीत बिल व तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला असून धूळखात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना भरउन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
मोहाडी तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीच्या देव्हाडा (बुज) येथे सन २०१८-२०१९ या वर्षात तीन लक्ष रुपये सामान्य निधीतून खर्च करून गावातील गरजू नागरिकांसाठी ''दहा रुपयांत वीस लीटर पाणी'' या धोरणावर शुध्द पिण्याच्या पाण्याचा आरो प्लांट उभारला होता. परंतु सदर आरो प्लांट तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच, सचिव, उपसरपंच व सदस्याच्या दुर्लक्षितपणामुळे, तर विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या काळात ग्रामपंचायतीत पैशाचा ठणठणाट असल्याने देखभाल, दुरुस्तीअभावी दोन वर्षांपासून बंद पडला आहे.
देव्हाडा बुज हद्दीत साखर कारखाना व तुमसर-गोंदिया-साकोली मार्गावर गुरांचा बाजार प्रसिध्द आहे. याच परिसरामध्ये व्यापारी संकुलच्या इमारतीत दोन वर्षांपूर्वी तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा आरो प्लांट तीन लक्ष रुपये खर्च करून उभारण्यात आला. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. नवीन पदाधिकारी विराजमान झाले. त्यांनी दोन बंद पडलेल्या आरो प्लांटचा काही प्रमाणात वीजबिल भरणा करून वीजपुरवठा सुरू केला होता. परंतु परत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने त्याला एक लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे.
आरो प्लांटला पूर्ववत सुरू करण्यासंबंधी विद्यमान पदाधिकारी अनुकूल आहेत. मात्र ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने आरो प्लांट जैसे थे स्थितीतच ठेवला गेला. त्यामुळे आरो प्लांटवर झालेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात बुडाला असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे व विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमूळे शुध्द पिण्याच्या पाण्यापासून नागरिकाना वंचित राहावे लागत आहे.
कोट
आरो प्लांटचे पंधरा महिन्यांचे थकीत विद्युत बिल ५५ हजार रुपयांच्या घरात आहे. तर आरो प्लांट मशीन तांत्रिकदृष्ट्या नादुरुस्त असल्याने ते दुरुस्त करण्यासाठी एक लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहेत. सद्यस्थितीत ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. तर सामान्य फंडात पर्याप्त निधी उपलब्ध नाही. त्यामुळे दुरुस्तीस अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी आरो प्लांट बंद अवस्थेत आहे.
- भाऊराव लाळे, उपसरपंच, ग्रा.पं. देव्हाडा (बुज)
===Photopath===
020621\1531-img-20210602-wa0053.jpg
===Caption===
थकीत विदयुत बील व दुरुस्ती अभावी दोन वर्षांपासून आरो प्लॉट बंद
देव्हाडा बुज येथील प्रकार, ग्रामपंचायत सामान्य फंडात निधीचा