जिल्ह्यात स्टॅम्पपेपरचा कृत्रिम तुटवडा
By admin | Published: July 8, 2016 12:33 AM2016-07-08T00:33:25+5:302016-07-08T00:33:25+5:30
येथील तहसील कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
भंडारा : येथील तहसील कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
तहसील कार्यालय परिसरात बोटावर मोजण्याइतके परवानाधारक स्टॅम्प वेंडर आहेत. १००, ५०० व १००० अशा किमतीचे लाखो रुपयांच्या स्टॅम्पची कोषागार कार्यालयातून दर महिन्याला उचल करीत असतात. तहसील कार्यालय व परिसरातील स्टॅम्प व्हेंडरांजवळ नेहमीच गर्दी असते. आता सर्वच कामांसाठी १०० रुपयांचे स्टॅम्प घ्यावे लागत असल्याने या स्टॅम्पना मागणीही मोठी असते. मात्र, दोन-तीन स्टॅम्प व्हेंडर वगळले तर इतर स्टँप नसल्याचे सांगतात. गुरुवारीही ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत होती. त्यामुळे अनेकांना कामासाठी स्टॅम्पची प्रतीक्षा करावी लागत होती. अधिकाऱ्यांकडून स्टॅम्प व्हेंडरच्या मागणीनुसार स्टँपचा पुरवठा करण्यात आल्याचे सांगण्यात येत असल्याने हा तुटवडा नेमका कसा होतो? की तुटवडा कृत्रिम आहे, याबाबत उलट-सुलट चर्चा आहे. स्टॅम्प नसल्याचे सांगणाऱ्या व्हेंडरांकडे चौकशी करून कारवाईची मागणी होत आहे.
यापुर्वी या ठिकाणी १०० रुपयांच्या स्टॅम्पसाठी अनेकदा ११० रुपये मोजावे लागतात. अशाप्रकारे तहसील कार्यालयातील स्टॅम्प वेंडरकडून नागरिकांची लूट सुरू आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातून दररोज कित्येक नागरिक तहसील कार्यालयामध्ये येत असतात. त्यांना विविध कामांसाठी वेगवेगळ्या मूल्यांच्या स्टॅम्प पेपरची गरज भासत असते. येथील व्हेंडरांजवळ स्टॅम्पचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेकांना स्टॅम्पसाठी रांगेत राहून प्रतीक्षा करावी लागत आहे. (नगर प्रतिनिधी़)