आश्रमशाळा शिक्षक समस्यांचे निराकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:41 AM2021-08-18T04:41:53+5:302021-08-18T04:41:53+5:30
भंडारा : नागपूर विभागातील कार्यरत आश्रमशाळा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या विमाशिचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या ...
भंडारा : नागपूर विभागातील कार्यरत आश्रमशाळा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या विमाशिचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने निकाली काढण्यात संघटनेला यश प्राप्त झाले. परिणामी, आश्रमशाळा शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे.
राज्यातील समाजकल्याण व आदिवासी विभागामार्फत सुरू असलेल्या आश्रमशाळांबाबत शासनाचे उदासीन धोरण असून, शिक्षकांच्या नियमित वेतनाच्या मुख्य समस्यांशिवाय या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर संस्थाचालकांची दडपशाही, आर्थिक शोषण, मानसिक त्रास देणे, या दडपशाहीविरोधात आवाज उठवल्यास नोकरीतून काढण्याचे पत्र देऊन शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करणे, अशा अनेक समस्या प्रलंबित असल्याची बाब विमाशिचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या निदर्शनास आल्या. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करून समस्या मार्गी लावण्याबाबत पुढाकार घेतला. त्यामुळे अनेक शिक्षकांच्या समस्या मार्गी लागल्या आहेत. यात प्रामुख्याने आश्रमशाळा पिट्टीगुडा येथील मृत्यू झालेले अधीक्षक स्व. सुभाष पवार यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याकरिता सर्व संघटनाना एकत्र करून एकदिवसीय शाळा बंद आंदोलन करून न्याय मिळाले.
आश्रमशाळा शेणगावाचे १७ वर्षे निलंबित असलेले गोविंद सखाराम लामतुरे यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शाळेने तीन वर्षे रुजू केले नव्हते. संघटनेनी नियमावर बोट ठेवून लामतुरे यांची पुनर्नियुक्ती करून वेतन सुरू केले. संतोष मोहनलाल राठोड, शिपाई आश्रमशाळा जिवती यांना संस्थाचालकाने नियमबाह्य रीतीने निलंबित करून त्यांचे जवळपास तीन वर्षांचे वेतन रोखले. याबाबत विमाशिच्या रेट्यामुळे संस्थाचालकाला १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
नामदेव पवार, सहा. शिक्षक, आश्रमशाळा, शेणगाव यांना सन २००४-०५ मध्ये नियमबाह्य अतिरिक्त ठरवून आठ महिन्यांचे वेतन रोखण्यात आले, संघटनेच्या दबावामुळे अधिकाऱ्यांनी त्यांचे थकीत वेतन देयक तात्काळ कार्यालयात सादर करण्याबाबत मुख्याध्यापकांना पत्राद्वारे ताकीद दिली. सुभाष नागापुरे, शिक्षक आश्रमशाळा, सुशी दाबगाव येथील शिक्षक सुभाष नागापुरे यांच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्तीवेतन व इतर क्लेम देण्यास संस्थाचालक टाळाटाळ करीत होते, संघटनेच्या प्रयत्नाने मृत्यूपश्चात त्यांना वरिष्ठ श्रेणीचा लाभ देऊन कुटुंब निवृत्तीवेतन व भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान देण्यात आला. बी.एम. भोयर, अधीक्षक, आश्रमशाळा, भुरकुंडा यांची जुलै-२००६ व २००७ च्या दोन नियमबाह्य गोठवलेल्या वेतनवाढी संघटनेच्या प्रयत्नांनंतर पूर्ववत करून थकबाकी देण्यात आली. आश्रमशाळा धोंडाअर्जुनी येथील चरण मत्ते यांचे नियमबाह्य निलंबन रद्द करून थकबाकीसह वेतन अदा करण्यात आले. एफ.आर. मडावी यांचे मुख्याध्यापकांनी नियमबाह्यपणे रोखलेले नियमिय वेतन पूर्ववत करण्यात आले.
बाबू तुळशीराम जाधव आश्रमशाळा, दमपूर मौदा यांचे प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरण निकाली काढण्यात आले,
तसेच प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत जे.जी. पिंपाळकर, जी.के. खिरवटकर, पी.एस. निरंजने व एस.आर. धावळे यांना प्रशिक्षित झाल्याच्या दिनांकापासून सहाव्या वेतन आयोगानुसार ५२००-२०२००, ग्रेड वेतन २८०० मधील किमान मूळ वेतन ८५६०/- मिळणेबाबत संघटनेकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला.
बॉक्स
संघटनेला यश
आश्रमशाळा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समूह अपघात विमा योजना लागू करणे, सातवा आयोग थकबाकी त्याचबरोबर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी मिळण्याबाबत शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला संघटनेस यश आले असून, परिपत्रक निर्गमित झाले. इत्यादी समस्या विमाशिचे सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने मार्गी लागल्यामुळे आश्रमशाळा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.