आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By admin | Published: July 15, 2016 12:49 AM2016-07-15T00:49:52+5:302016-07-15T00:49:52+5:30
शासन या ना त्या कारणाने आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना वेठीस धरत आहे. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने...
पवनी : शासन या ना त्या कारणाने आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना वेठीस धरत आहे. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १ एप्रिलचे काम नाही, वेतन नाही धोरण लागू करण्याकरिता काढलेले शासन परिपत्रक रद्द करावे व विजाभज विमाप्र आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याकरिता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रालयासमोर महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघातर्फे मोठे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात भंडारा जिल्ह्यासह राज्यातून हजारो कर्मचारी सहभागी होणार आहेत.
१ एप्रिलचा अन्यायकारक जीआर रद्द करावा, अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन देवून त्यांचे समायोजन करावे, आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना १ तारखेला वेतन दयावे, विजाभज आश्रमशाळा संहिता तात्काळ मंजूर करुन लागू करावी, चतुर्थ कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती वेतनश्रेणी लागू करावी. १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागु करावी आदी मागण्यांकरिता या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील जवळपास १००० आश्रमशाळा कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत. गेली अनेक वर्षे काम करुन वेतन घेत असलेल्या या कर्मचारी वर्गावर अचानक शासनाने अतिरिक्तचा शिक्का मारुन वेतन थांबविल्याने सांगा कस जगायच असे म्हणण्याची वेळ आली आहे. राज्यात स्वयंसेवी संस्थाकडून विजाभज विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक ५२६, माध्यमिक २९६ व उच्च माध्यमिक आश्रमशाळा असून १२,५३८ कर्मचारी कार्यरत आहेत. मोठ्या संख्येने कर्मचारी अतिरिक्त झाल्यामुळे शासनाने या जीआरचा आधार घेवून त्यांचे वेतन थांबविले आहे व सेवासमाप्तीचा बडगा उभारला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट होवून त्यांच्यात शासनाविषयी रोष निर्माण झाला आहे. १८ जुलैच्या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठींबा दिला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व राज्य संघटनेचे अध्यक्ष गोविंद गुजाळ, एकनाथ देशमुख, देवेंद्र नाकाडे, अरविंद लाडेकर, अनिता चव्हाण, लक्ष्मीकांत तागडे आदी करणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)